मुंबई प्रतिनिधी । काँग्रेस पक्षाने आधी गोंधळातून बाहेर यावे, मगच स्वबळाची भाषा करावी असा खोचक सल्ला शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी आज दिला आहे.
स्वबळावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जुंपली आहे. यावरून कालच मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस व भाजप नेत्यांचा कानपिचक्या दिल्या आहेत. तर आज यावर संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. संजय राऊत म्हणाले की, “अनेक राजकीय पक्ष स्वबळावर लढण्याची भाषा करत आहेत. हा त्यांचा प्रश्न आहे. पण त्या पक्षातील एक नेता स्वबळाची भाषा करतो आणि दुसरा नेता म्हणतो ही आमची भूमिका नाही. त्यामुळे त्या सगळ्यांनी आधी त्या गोंधळातून बाहेर यावं, त्यानंतर स्वबळ वैगरे काय आहे त्यासंदर्भात निर्णय घ्यावा. पण शिवसेनेविषयी म्हणाल झालं तर शिवसेना पक्षप्रमुख यांनी काल महाराष्ट्रातील जनतेला, लाखो शिवसैनिकांना ही दिशा दिली आहे, त्यानुसार शिवसेना कोणत्याही लढाईस कायम तयार आहे. बळावर, स्वबळावर किंवा अन्य कोणत्याही विषयावर…”
राऊत म्हणाले की, “महाराष्ट्र कधी कोणाच्या वाट्याला जात नाही आधी, शिवसेनासुद्धा. पण जर कोणी अंगावर आलं तर सोडत नाही. त्यामुळे या राज्यात शांतता नांदायची असेल तर प्रत्येकानं आपली जबाबदारी आणि कर्तव्य ओळखली पाहिजे. सत्ता नसल्यामुळे काही लोकांना पोटदुखी सुरु झाली आहे. त्यावर काल मुख्यमंत्र्यांनी पोटात घ्यायचं औषध दिलं आहे. उगळून लावायचं नाही. त्यामुळे आता हळूहळू आजार बरा होईल.”