बीएचआर सहकारी पतसंस्थेतील घोटाळ्याच्या दुसर्या टप्प्यात अनेक मातब्बरांना गजाआड जावे लागले असून काहींवर लवकरच कारवाईची कुर्हाड पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणातील विविधांगी कंगोरे उलगडून दाखविणारा ज्येष्ठ पत्रकार सुरेश उज्जैनवाल यांचा हा विशेष लेख.
बीएचआर मल्टिस्टेट सहकारी पतसंस्थेच्या सर्व सामान्य ठेवीदारांच्या ठेवी च्या रकमेची संघटीतपणे नियोजित लूटमार करणार्या प्रकरणाचा तपास करणार्या आर्थिक गुन्हे विभागाच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके व त्यांच्या तपासाची न्यायालयात बाजू मांडणार्या वकिलांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि असंख्य असहाय ठेविदारांच्या वतीने धन्यवाद ! वास्तविक राज्याचा सहकार कायदा वाजवी पेक्षा अधिक लिबरल असतांनाही लूटमार करणार्या व्हाईट कॉलर आरोपींना गजाआड करणे तितकेसे सोपे नव्हते, तरी उपायुक्त भाग्यश्री नवटके व त्यांच्या टीमने ज्या पद्धतीने या प्रकरणाचा छडा लावत आहे, ते अदभूत म्हणावे लागेल म्हणून लेख लिहिताना सर्वात आधी त्यांचे (पोलिसांचे) कौतुक करणे क्रमप्राप्त आहे.
बी एच आर संस्थेतील घोटाळ्याचे एक-एक पैलू जसे समोर येत आहे, ते बघून सराईत चोरटे, दरोडेखोर कमालीचे चक्राऊन गेले आहेत. काहींना स्वतःची लाज वाटू लागली आहे,तर काहींना प्रचंड मन:स्ताप होतो आहे. पाच-पंचवीस हजारांसाठी दरोड्याच्या माध्यमातून खून खराबा करण्या पेक्षा ठेवीच्या पावत्या मॅचिंग करण्याचा उद्योग आपल्याला कसा सुचला नाही? असे त्यांना वाटू शकते.
या प्रकरणाचा तपास जस जसा पुढे जात आहे, तस तसे नवं नवे पैलू समोर येत आहेत. भाजपचे आमदार माजी मंत्री गिरीश महाजन यांना या कारवाईत राजकारणाचा वास येत आहे. त्यांच्या मते हे प्रकरण निव्वळ राजकारण आहे. तटस्थपणे या प्रकरणाचे निरीक्षण केले असता आणि ज्या पद्धतीने आर्थिक गुन्हे विभाग तपास करीत आहे, ते पहाता राजकीय वास किंवा हस्तक्षेप दिसून येत नाही. उलट भ्रष्ट व संधीसाधूंच्या दुर्गंधीचा मात्र ठेविदार व सर्व सामान्य जनतेला अनुभव येत आहे. कोट्यवधींचे कर्ज घेऊन ते बुडविणार्यांची पाठराखण करणार्यांना आता लोकप्रतिनिधी म्हणण्यास आता संकोच वाटू लागला आहे. सर्व सामान्य ठेवीदाराची एक हजार रुपयांची ठेव तीनशे रुपयात घेतली जात असताना राजकीय वासाचा आरोप करणारे लोक प्रतिनिधी झोपेत होते का ? परवा ज्या १२ लाभार्थ्यांना (आरोपी) पोलीस पथकाने कोर्टाचे वारंट काढून अटक केली ते काही समाज सेवक नव्हेत. खर तर पत संस्थांची वाट लावणारे बहुतांशी राजकारणी आणि त्यांचे लाभार्थी पँटरच होत. ज्या ठेवीदारांचे कष्टाचे पैसे संघटीतपणे लुटले गेले त्यांच्या बद्दल सहानुभूतीचा वास का येत नाही? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
विना सहकार नाही उद्धार…..! या घोष वाक्यांमुळे सर्व सामान्यांमध्ये सहकार रुजला अन वाढला ही. शेतकर्यांना सावकारांच्या जाचातून सोडविण्यासाठी सुमारे एकशे सोळा वर्षांपूर्वी (१९०४ या वर्षी)सहकार चळवळीची मुहूर्तमेढ रोवली गेली. सहकार महर्षी वैकुंठभाई मेहता आणि महात्मा गांधी यांनी ही चळवळ पुढे नेण्यासाठी लोकजागृती केली. त्यातूनच १९२० च्या सहकार कायद्याचा जन्म झाला नंतर हाच १९६० चा सहकारी कायदा म्हणून ओळखला गेला व आजही तो लागू आहे. गेल्या शंभर वर्षात या चळवळीने अनेक चढ उतार पाहिले, काही गोड कडू प्रसंग ही अनुभवले.तरी देखील ही चळवळ मोठया जोमाने मार्गक्रमण करीत ती फोफावली व गावोगावी सहकारी संस्थांचे जाळे विणले गेले.
स्वातंत्र्यानंतर विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था, बाजार समीत्या, खरेदी विक्री संघ अश्या विविध संस्था ग्रामीण भागासाठी पूरक अर्थ व्यवस्था किंवा समांतर अर्थ व्यवस्था ठरल्या. साधारणपणे सन १९८० नंतर बिगर शेती पत पुरवठा संस्था उदयास आल्या आणि गावोगावी अशा संस्थांनी आपले बस्तान बसविले. सुरवातीच्या दहा वर्षांच्या कालखंडात
या संस्थांची उपयुक्तता व आर्थिक प्रभाव लक्षणीय ठरला. त्यातून काही नवे सहकार नेतृत्व उजेडात आले,अर्थचक्र ही गतिमान झाले. खेडोपाडी लहान उद्योग,व्यवसाय वाढीस लागले. या संस्था च्या माध्यमातून कोट्यधीच्या ठेवी वाढल्या. सहकारावरील विश्वास वाढीस लागला. सहकार क्षेत्राच्या एका अशासकीय अहवालानुसार सन २००५ पावेतो जळगाव जिल्हा तसेच या पत संस्था चें कार्यक्षेत्राच्या कक्षेत सुमारे तीन हजार कोटींच्या ठेवींचा पल्ला गाठलेला होता. ही एक फार मोठी आर्थिक मजल म्हणता येईल.
साधारणपणे १९९५ पासून सहकारी पत संस्था स्थापन करण्याची जणू स्पर्धाच सुरू झाली. ज्यांना सहकाराची व्याख्याही माहीत नाही, असे काही संधीसाधू, भामटे या क्षेत्रात आले व त्यांनी जादा व्याज दराचे आमिष दाखवून ठेवीदारांना आपल्या जाळ्यात ओढले आणि एका चांगल्या चळवळी चा गळाच घोटला गेला. याला सर्वाधिक जर कुणी जबाबदार असेल तर ते सहकार विभागातील भ्रष्ट आणि बेजबाबदार अधिकारी, आणि काही अंशी राजकारणी..!
जिल्ह्यातील ज्या नावाजलेल्या अथवा मोठ्या संस्था होत्या, त्या पैकी ३४ संस्था भ्रष्ट संस्थाचालकामुळे कायमच्या बंद पडल्या व त्यातील असंख्य ठेवीदारांच्या कोट्यवधी रूपयांच्या ठेवीही ही बुडाल्या. काही ठेवीदारांनी आत्महत्या केल्या. अनेक ठेवीदार धक्क्याने आजारी पडले….पैसा व औषधोपचार अभावी त्यांचे हाल झाले, काही मरण पावले. मुलींचे लग्न मोडले गेले ! एवढे अनर्थ या भ्रष्ट संस्था चालकांमुळे घडला.
बीएचआर अर्थात भाईचंद हिराचंद रायसोनी सहकारी पतसंस्था मधील ठेवीदारांच्या ठेवी परत करण्याचा प्रकार पहाता ती एक सुनियोजित संघटित लुटालूट म्हणण्या शिवाय दुसरा पर्यायच नाही. बीएचआर वरील प्रशासक जितेंद्र कंडारे यांनी केलेली मनमानी हा तर सहकारातील फारच दुर्मीळ अफलातून प्रकार म्हणता येईल. संस्थेच्या ठेवीदारांपेक्षा हा अधिकारी काही भामट्या वृत्तीचे व्यापारी, बेईमान धंदेवाईक यांचे हित अधिक जोपासत असल्याचे समोर आलेल्या माहितीतून दिसून येत आहे.परंतु एकटा प्रशासक अथवा आवसायक हे सर्व स्वतः च्या हिमतीवर करू शकतो का? हा खरा प्रश्न आहे. मुळात त्याला प्रशासक पदी कुणी आणले, का आणले, आणण्या मागचा हेतू काय? या प्रश्नांची उत्तरे मिळायला हवीत. यातून या संघटीत लुटीमागचे खरे सूत्रधार समोर येऊ शकतात.
सुरेश उज्जैनवाल – ज्येष्ठ पत्रकार, जळगाव