भुसावळ प्रतिनिधी । शहरातील कुख्यात गुंड तस्लीम उर्फ काल्या शेख सलीम आणि कलीम शेख सलीम शेख या दोन भावांवर जिल्हाधिकार्यांनी एमपीडीएच्या अंतर्गत स्थानबध्दतेची कारवाई केली आहे.
भुसावळातील कुख्यात तस्लीम उर्फ काल्या शेख सलीम (वय ३०) आणि कलीम शेख सलीम शेख (वय ३२, दोन्ही रा.दीनदयाळ नगर, भुसावळ) या दोन्ही भावंडांवर अनेक गुन्हे आहेत. सराईत गुन्हेगार म्हणून ते परिसरात कुख्यात आहेत. त्यांच्यावर मारामारी, लूट, जबरी लूट तसेच मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी अनेक गुन्हे दाखल आहेत. या पार्श्वभूमिवर, या भावंडांवर जिल्हाधिकारी डॉ.अभिजित राऊत यांनी एमपीडीए म्हणजेच स्थानबद्धतेची कारवाई केली.
पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी बाजारपेठचे पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांनी या दोघांच्या एमपीडीएचा प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकार्यांकडे पाठवला होता. जिल्हाधिकारी डॉ.राऊत यांनी या प्रस्तावावर स्वाक्षरी केली. त्यानुसार दोघांवर एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली.
तस्लीम उर्फ काल्या शेख सलीम (वय ३०) आणि कलीम शेख सलीम शेख (वय ३२, दोन्ही रा.दीनदयाळ नगर, भुसावळ) यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन जळगाव कारागृहात हलवले आहे.