जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात वेगवेगळ्या आठ गंभीर गुन्ह्यातील दोन सराईत गुन्हेगारांना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. हद्दपार करण्याच्या प्रस्तावाला जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी नुकतीच मंजूरी दिली आहे.
राहूल रामचंद्र बऱ्हाटे (वय २७, रा. रामेश्वर कॉलनी) व गोलु उर्फ दत्तु नारायण चौधरी (वय २६, रा. तुकारामवाडी) असे हद्दपार केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांपासून राहूल व दत्तू हे दोघे शहरात दहशत माजवण्याच्या उद्देशाने घातक शस्त्र बाळगुन फिरत होते. वेळोवेळी पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केलेले आहेत. दोघांवर जिल्हापेठ व एमआयडीसी पोलिस ठाण्यात बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, दंगल, मारहाण करणे, दहशत परवणे, घरांवर अतिक्रमण करुन बळकावणे, घरात अनधिकृत प्रवेश करणे, या सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. सहा महिन्यांपासून त्यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यानंतरही या दोघांनी तालुक्यातील कुसुंबा येथे एका तरुणास जुन्या भांडणाच्या कारणावरुन चॉपरने वार करुन जखमी केले होते. दरम्यान, पोलिस उपअधिक्षक कुमार चिंथा यांनी दोघांच्या हद्दपारीचा प्रस्ताव तयार केला. पोलिस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी या प्रस्ताव मंजुर केल्यानंतर या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले.