पाचोरा येथे बनावट अँटीजन टेस्ट रिपोर्ट दाखवून खरेदी-विक्री व्यवहार

पाचोरा प्रतिनिधी । येथे दुय्यम निबंधक कार्यालयात येणाऱ्‍या अभ्यागतांना खरेदी-विक्री व्यवहार करवून घेण्यास कोरोना रिपोर्ट अनिवार्य करण्यात आला आहे. मात्र, कार्यालयात बनावट कोरोना अहवाल दाखवून खरेदी-विक्री व्यवहार करण्यात येत आल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पाचोरा नगरपरिषदेने चौकशी सुरू केली असून बनावट कोरोना अहवाल देणाऱ्‍या टोळीचा लवकरच पर्दाफाश  होणार आहे. 

एक महिन्यापूर्वीच लाच लुचपत  विभागाचा सापळा यशस्वी झाल्यानंतर पाचोरा येथील दुय्यम निबंधक कार्यालयाची राज्यभरात नाचक्की झाली होती. मात्र पैशांच्या हव्यासापायी भल्याभल्यांना पुन्हा पुन्हा बेकायदेशीर कृत्य करायला भाग पाडतो. पाचोरा खरेदी – विक्री (दुय्यम निबंधक) कार्यालयात नगर परिषदे द्वारा करण्यात येणाऱ्या अँटीजन टेस्टचे खोटे रिपोर्ट सादर करून खरेदी विक्री व्यवहार केले जात आहेत. या नव्या प्रकरणाची सखोल व पुराव्या निशी माहिती पाचोरा नगर परिषद मुख्याधिकारी श्रीमती शोभा बाविस्कर यांना प्राप्त झाली आहे.  याप्रकरणी  मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी तहसिलदार कैलास चावडे यांचेशी बंद द्वार चर्चा करून मार्गदर्शन घेतले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या बैठकीस पालिका उपमुख्याधिकारी प्रकाश भोसले, दुययम निबंधक श्री. गांगोडे उपस्थित असल्याचे कळते. 

याप्रकरणी तालुका प्रशासन यंत्रणा व नगरपालिका प्रशासनाला अँटिजेन टेस्ट रिपोर्ट स्लिप मध्ये घोटाळा होत असल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास आले आहे. प्रशासनाने संयुक्तरीत्या  मागील काही दिवसांपासून च्या व्यवहारांची माहिती संकलित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. या हालचालीची कुणकुण महसूल कार्यालय परिसरात लागल्याने संबंधित खोटे अँटिजेन टेस्ट रिपोर्ट देणाऱ्या टोळीचे धाबे दणाणले आहे.

खोटा अँटीजेन टेस्ट रिपोर्ट प्रकरणी उप विभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील यांनी तातडीने दखल घेऊन नगरपालिके द्वारा हुतात्मा स्मारकात करण्यात आलेल्या मागील एक महिनाभराच्या याद्यांची साक्षांकित झेरॉक्स प्रत ताब्यात घेणे गरजेचे आहे. याप्रकरणी उपजिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी राजेंद्र कचरे पाटील काय दखल घेतात ? याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

 

Protected Content