मुंबई : वृत्तसंस्था । राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षाबद्दलचा निर्णय शिक्षण खात्याने आता आपत्ती व्यवस्थापन खात्याकडे सोपवला आहे
केंद्र सरकारने सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर गुजराज, हरयाणा आणि मध्यप्रदेश या राज्यांनी देखील आपापल्या राज्य बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द केल्या. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या परीक्षांबाबत राज्य सरकार नेमका काय निर्णय घेणार? याची चर्चा सुरू झाली होती. त्यासंदर्भात सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना उत्सुकता लागून राहिली होती. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये त्यासंदर्भात निर्णय होईल अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, त्यावर आजही निर्णय न झाल्याचं स्पष्ट झालं आहे. मंत्रिमडळात आज बारावीच्या परीक्षांबाबत झालेल्या चर्चेची माहिती देताना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत यावर स्पष्टीकरण केलं आहे.
“शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन विभागाला ही फाईल पाठवत आहोत. आज किंवा उद्या त्यांची बैठक होईल. त्यात ते फाईलवर निर्णय घेतील आणि त्यानुसार आम्ही तुम्हाला अतिरिक्त माहिती देऊ. सध्याच्या कोविडच्या परिस्थितीमध्ये सर्व निर्णय हे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून घेतले जात आहेत. त्यानुसार आम्ही ती फाईल त्यांच्याकडे पाठवली आहे”, असं वर्षा गायकवाड यांनी यावेळी सांगितलं.