यंदा १०वीची परीक्षा नाहीच ; मूल्यमापनातून निकाल ठरवणार

 

मुंबई : वृत्तसंस्था । विद्यार्थी , पालक आणि शिक्षकांच्या आरोग्याचा विचार करून यंदा १० वीची परीक्षा न घेता विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून निकाल ठरविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे

 

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत इयत्ता १० वीच्या परीक्षा रद्द करत असल्याचा निर्णय याआधीच शिक्षण विभागानं जाहीर केला होता. पण विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करताना त्यांचं मूल्यमापन नेमकं कशापद्धतीनं केलं जाणार? असा सवाल उपस्थित केला जात होता. यासंदर्भात शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

 

“राज्यातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचं आरोग्य हेच सरकारचं प्राधान्य आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर बोलवणं योग्य होणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय सरकारनं याआधीच घेतला आहे. पण विद्यार्थ्यांचं मूल्यमापन हे प्रत्येक विषयानुसार होणार असून त्यासाठी प्रत्येक विषयाला १०० गुणांच्या आधारावर मूल्यमापन केलं जाणार आहे”, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

 

राज्यातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रांवर परीक्षा होणार नसली तरी त्यांच्या आजवरच्या शालेय कामगिरीच्या आधारावर १०० गुणांची विविध भागांत विभागणी करण्यात आली आहे. यात दहावीच्या अभ्यासक्रमावर लेखी परीक्षेसाठी ३० गुण, इयत्ता १० वीचे विद्यार्थ्यानं आजवर केलेले गृहपाठ आणि तोंडी परीक्षेसाठी २० गुण आणि इयत्ता नववीच्या निकालाला ५० गुण अशाप्रकारे विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करण्यात येणार आहे.

यंदा इयत्ता १० वीच्या परीक्षेला असणाऱ्या विद्यार्थ्यांचा इयत्ता ९ वीचा निकाल लागला त्यावेळी कोरोनाचं संकट नव्हतं. त्यामुळे तो निकाल सामान्य परिस्थितीतील निकाल होता. त्याच पार्श्वभूमीवर इयत्ता ९ वीच्या निकालाला ५० गुण देण्यात आले आहेत, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

 

इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्यात येणार असलं तरी शाळांद्वारे केल्या जाणाऱ्या मूल्यमापनावर विद्यार्थी नाखुश असतील तर त्यांना इयत्ता ११ वीच्या प्रवेशासाठी पर्याय म्हणून सामाईक परीक्षा (सीईटी) देता येणार आहे.

 

इयत्ता १० वीचा निकाल मूल्यमापनानं लागल्यानंतरही ११ वीच्या परीक्षेसाठी सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांना अकरावीच्या प्रवेशासाठी प्राधान्य दिलं जाईल. त्यानंतर उर्वरित जागांवर अंतर्गत मूल्यमापनाद्वारे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल, असंही वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.

 

इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा निकाल जूनच्या अखेरपर्यंत लावण्याचं लक्ष्य शिक्षण बोर्डाचं असल्याचंही वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. याशिवाय जे विद्यार्थी शाळेनं केलेल्या मूल्यमापनावर खूश नसतील त्यांना पुढील काळात दोन तासांच्या परीक्षेचं आयोजन करण्याबाबतही शिक्षण विभाग विचार करत असल्याचं गायकवाड यांनी सांगितलं आहे.

Protected Content