कोरोना लाटेमुळे मोदी लाट ओसरणार?

 

मुंबई : वृत्तसंस्था । लोकसत्ताने घेतलेल्या सर्वेक्षणात आज निवडणूक झाल्यास भाजपा १०० जागादेखील मिळवू शकत नाही असं मत नोंदवलं गेलं आहे.

 

पहिल्या लाटेत यशस्वी नियंत्रण मिळवत जगभरातून कौतुकास पात्र ठरलेल्या मोदी सरकारला सध्या मात्र इतर देशांकडे मदत मागण्याची वेळ आली आहे. विरोधक मोदी सरकारवर निशाणा साधत असून आपल्या देशात लसपुरवठा करण्याआधी इतर देशांना निर्यात का केली अशी विचारणा करत आहेत. याचा परिणाम मोदी सरकारच्या लोकप्रियतेवरही झालेला आहे.

 

नरेंद्र मोदींनी पंतप्रधानदी आपली सात वर्षांची कारकीर्द पूर्ण केली आहे.  याच पार्श्वभूमीवर मोदी सरकारच्या कामगिरीबद्दल वाचकांचं मत जाणून घेण्यासाठी लोकसत्ता डॉट कॉमने २५ आणि २६ मे रोजी सर्वेक्षण घेतलं.

 

यावेळी वाचकांना आज लोकसभा निवडणूक झाली तर मोदी सरकारला ५४३ पैकी किती जागा मिळतील? असं विचारण्यात आलं होतं. यावर २३.७ टक्के वाचकांनी मोदी सरकारला १०० पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत असं मत नोंदवलं आहे. तर २९.७ टक्के वाचकांनी मोदी सरकारला १०० ते २०० दरम्यान जागा मिळतील असं सांगितलं आहे. तसंच १७.८ टक्के वाचकांनी मोदी सरकार २०१ ते ३०० दरम्यान जागा मिळवण्यात यशस्वी होईल असं सांगितलं आहे.

 

मत नोंदवणाऱ्यांपैकी एकूण २३.६ टक्के वाचकांनी मोदी सरकारला ३०१ ते ४०० दरम्यान जागा मिळतील असा विश्वास व्यक्त केला आहे. तर फक्त ५.२ टक्के वाचकांनी ४०० पेक्षा जास्त जागा मिळतील असं म्हटलं आहे. विशेष म्हणजे २०० पेक्षाही कमी जागा मिळतील असं मत व्यक्त करणाऱ्यांचं प्रमाण हे ५० टक्क्यांहून अधिक आहे. २०० पेक्षा कमी जागा मिळतील असे दोन पर्याय निवडणाऱ्या वाचकांची एकत्रित संख्या ५३.४ टक्के इतकी आहे.

 

दरम्यान पश्चिम बंगाल निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर मोदींचा करीश्मा घटलाय असं वाटतं का ? हा प्रश्नही वाचकांना विचारण्यात आला होता. यावर तब्बल ५३.४ टक्के वाचकांनी हो असं मत नोंदवलं असून ४१.१ टक्के वाचकांनी नकार दिला आहे. तर ५.५ टक्के वाचक तटस्थ राहिले आहेत.

 

Protected Content