शेतकऱ्यांना कापूस बियाणे १५ मेनंतर उपलब्ध करुन द्या — खासदार उन्मेश पाटील

चाळीसगाव, प्रतिनिधी ।  जिल्ह्यात कापसाचा पेरा अंदाजे साडेचार ते साडेपाच लाख हेक्टर असून यापैकी बागायत कापसाची लागवड प्रामुख्याने शेतकरी मे महिन्यात करीत असतो. परंतु शासनाने  एक जूननंतर शेतकऱ्यांना कापुस बियाणे उपलब्ध व्हावे असे आदेशीत केले आहे. हा शेतकऱ्यांवर अन्याय असून शासनाने शेतकऱ्यांना कापूस बियाणे १५  मेनंतर उपलब्ध करुन द्यावे अशी मागणी खासदार उन्मेश पाटील यांची कृषि सचिवांकडे एका पत्रान्वये केली आहे.

याबाबत खासदार उन्मेश पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे की,  शेतकऱ्यांकडून प्राप्त झालेल्या सूचनानुसार आपणास कळवू इच्छितो की सदरील कापूस बियाणे दि. १५ मे नंतर ऊपलब्ध करुन द्यावे.  असे न केल्यास शेतकरी जवळच्या राज्यातून, अथवा काळाबाजारातून या पर्यायी मार्गाने बियाणे खरेदी करतील. यात त्यांना बोगस बियाणे तसेच त्यांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम “एक गाव एक वाण” याला देखील एक जून नंतर बियाणे उपलब्ध झाल्यास या कार्यक्रमाला हरताळ फासले जाईल. कारण शेतकरी कापूस लागवडीसाठी जून महिन्यापर्यंत थांबत नसतो ही वस्तुस्थिती आहे. आपण याबाबत तातडीने आदेशित करुन कापूस बियाणे दि. १५ मे नंतर उपलब्ध करुन द्यावे अशी सूचना वजा विनंती खासदार उन्मेशपाटील राज्याचे कृषी सचिव तसेच कृषी आयुक्त यांच्याकडे केली आहे.

Protected Content