जळगाव (प्रतिनिधी) जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपातील गोंधळाचे वातावरण काही केल्या शांत होत नाहीय. आ. स्मिताताई वाघ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतरही तिकीट कापले गेल्यामुळे त्यांच्या समर्थकांनी आज जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करत घोषणाबाजी केली. परंतु स्मिताताई यांनी सर्व कार्यकर्त्यांची समजूत घातल्यामुळे तणाव निवळला. दरम्यान, या आंदोलनामुळे काही वातावरण गंभीर झाले होते.
आ. स्मिताताई वाघ यांची उमेदवारी ऐनवेळी रद्द करत त्यांच्या जागी चाळीसगावचे आमदार उमेश पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे संतप्त झालेल्या स्मिताताई यांच्या कार्यकर्त्यांनी जळगाव येथील शिवाजी चौकातील आमदार गिरीश महाजन यांच्या जीएम फाउंडेशन संपर्क कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली. ‘स्मिता ताई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा देण्यात येत होत्या. स्मिताताई वाघ यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवावी,असा आग्रह यावेळी कार्यकर्त्यांनी धरला. परंतु आ. स्मिताताई वाघ यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढत आंदोलन मागे घेण्यास सांगितले. दरम्यान, भाजपमधील उमेदवारीचा घोळ अंतर्गत वादाला खतपाणी घालत आहे.