लागोपाठ दुसर्‍या दिवशी चार लाखांपेक्षा जास्त कोरोना रूग्ण

0
17


नवी दिल्ली वृत्तसंस्था । कोरोनाचा हाहाकार कमी होण्याचे कोणतेही चिन्ह नसून काल दिवसभरात देशात चार लाख १४ हजार रूग्ण आढळून आले आहेत. तर या पार्श्‍वभूमिवर, पंतप्रधान आज देशाला संबोधित करणार असून ते लॉकडाऊनबाबत भाष्य करण्याची शक्यता आहे.

दैनंदिन रुग्णसंख्या सलग दुसऱ्या दिवशी चार लाखांच्या पुढे गेली आहे. बुधवारी ४ लाख १२ हजार ७८४ रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर गुरुवारी ४ लाख १४ हजार ५५४ नवे रुग्ण आढळले. आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात जवळपास दोन हजारांनी वाढ झाली आहे. तर 3 हजार 915 रुग्णांना प्राण गमवावे लागले. दिलासादायक बाब ही, की कालच्या दिवसात देशात 3 लाख 31 हजार 507 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. ही संख्याही आदल्या दिवसापेक्षा अधिक आहे.

दरम्यान, या सर्व पार्श्‍वभूमिवर, आज रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला संबोधित करणार आहेत. यात ते लॉकडाऊनबाबत घोषणा करू शकतात. यामुळे देशव्यापी लॉकडाऊनची शक्यता पुन्हा एकदा बळावल्याचे दिसून येत आहे.