मुंबई : वृत्तसंस्था । आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलेल्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये राज्यासाठी दिलासादायक चित्र आहे. “ तीन आठवड्यांमध्ये पहिल्यांदाच राज्यात नव्या बाधित रुग्णांपेक्षा बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या अधिक झाली आहे.
राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाची परिस्थिती हळूहळू गंभीर होऊ लागली आहे. रोज मोठ्या संख्येनं रुग्ण वाढत असल्यामुळे आणि दुसरीकडे लसीचे डोस देखील अपुरे पडत असल्यामुळे राज्यात वेगानं वाढणाऱ्या कोरोनाला आळा कसा घालावा? असा प्रश्न राज्य सरकारसमोर उपस्थित झाला होता. त्या पार्श्वभूमीवर राज्यात १४ एप्रिल रोजी संध्याकाळी ८ वाजेपासून लॉकडाउन लागू करण्यात आला होता.
आज दिवसभरात आत्तापर्यंत राज्यात ४८ हजार ६२१ रुग्ण सापडले असताना तब्बल ५९ हजार ५०० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत”, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.
महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे भारताच्या सरासरी रिकव्हरी रेटपेक्षा जास्त असल्याचं देखील राजेश टोपे यांनी सांगितलं. “राज्यात पॉझिटिव्हिटी रेट २७ टक्क्यांवरून २२ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे ५ टक्क्यांनी ही घट दिसत आहे. आपण चाचण्या कुठेही कमी केलेल्या नाहीत. २.५ लाख ते २.८ लाख टेस्ट प्रतिदिन आपण करत आहोत. जवळपास ६५ टक्के चाचण्या या आरटीपीसीआर आहेत. अनेक राज्य ९० टक्के अँटिजेन टेस्ट करत आहेत. उत्तर प्रदेशातही ते होतंय. प्रति १० लाख लोकसंख्येमागे २ लाख चाचण्या आपण करत आहोत. रुग्णसंख्या, मृत्यू कमी होत आहेत. गेल्या ३ आठवड्यात डिस्चार्ज रेट ४८ हजार ६२१ रुग्ण सापडले आहेत, तर डिस्चार्ज ५९ हजार ५०० पर्यंत गेली आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट ८४.०७ टक्के झाला आहे. तर देशाचा रिकव्हरी रेट ८१ टक्के आहे”, असं ते म्हणाले.
राज्यातल्या एकूण १२ जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्येत घट होत असल्याची माहिती राजेश टोपेंनी दिली. मात्र, त्यासोबतच २४ जिल्ह्यांत वाढ होतच आहे असं ते म्हणाले. “महाराष्ट्राच्या एकूण ३६ जिल्ह्यांपैकी १२ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रुग्णांच्या संख्येत घट होतेय. तरी अजूनही २४ जिल्ह्यांत वाढच आहे. ती कमी करण्याचं टार्गेट आपल्यासमोर आहे”, असं त्यांनी सांगितलं.
राज्यात निर्माण झालेल्या लस तुटवड्यामध्ये केंद्र सरकारकडून ४५ पुढच्या नागरिकांना लसीकरण करण्यासाठी कोविशिल्ड लसीचे ९ लाख डोस आल्याचं टोपेंनी यावेळी सांगितलं. “४५ पासून पुढच्या वयोगटासाठी कालपर्यंत २५-३० हजार लसीचे डोस पूर्ण महाराष्ट्रात होते. म्हणून आपल्याला बऱ्याच ठिकाणी लसीकरण थांबवावं लागलं. मात्र, आत्ता ९ लाख डोस आपल्याकडे आले आहेत. पण हा देखील दोन दिवसांसाठीचाच कोटा आहे”, असं ते म्हणाले. “४५ वर्षांवरच्या एकूण साडेतीन कोटी लोकांपैकी १ कोटी ६५ लाख लोकांना आपण लस दिली आहे. अजून साधारणपणे ५० टक्के लोकांना लस द्यायची आहे. देशात ४ ते ५ राज्यांनी १ मे रोजी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरण सुरू केलं. त्यात महाराष्ट्र देखील आहे. प्रत्येक जिल्ह्यात ५ केंद्रांवर हे लसीकरण आपण केलं आहे. त्यानुसार या वयोगटातल्या १ लाख लोकांना आपण लस दिली आहे”, असं देखील त्यांनी सांगितलं.