मुंबई : वृत्तसंस्था । छगन भुजबळ यांनी चंद्रकांत पाटलांच्या धमकीला उत्तर दिलं. ते म्हणाले की, “चंद्रकांत पाटील यांनी पराभवसुद्धा सहन करण्याची शक्ती ठेवली पाहिजे. त्यांच्या दुर्दैवाने यापुढे वारंवार त्यांना पराभवाचे फटके बसणार आहेत. त्यामुळे पराभव सहन करण्याची शक्ती ठेवून त्यांनी थोडं सांभाळून बोललं पाहिजे”
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना ममता बॅनर्जींचं कौतुक केलं होतं. यावेळी त्यांनी ममता बॅनर्जींना झाशीच्या राणीची उपमा दिली होती. यामुळे संतापलेल्या चंद्रकांत पाटील यांनी जामीनावर सुटला आहात, अजून निर्दोष सिद्ध झालेला नाहीत. त्यामुळे फार जोरात बोलू नका, अन्यथा फार महागात पडेल अशी धमकीच भुजबळांना दिली.
“भुजबळांचा पुतण्या माझ्याकडे सोडवण्याची विनवणी करत होता असं त्यांचं म्हणणं आहे. पण माझा पुतण्या म्हणजे समीर भुजबळला माझ्या दोन महिने आधी जेलमध्ये टाकलं होते. मग तो कधी जाईल यांच्याकडे? मुलाचं बोलाल तर तो लांबच होता. त्यामुळे कोण पुतण्या आणि कशासाठी काढला हे माहिती नाही,” असं भुजबळांनी म्हटलं आहे.
“माझ्या केसेस कोर्टात असताना ते महागात पडेल असं म्हणत असतील तर त्याचा काय अर्थ समजायचा. ईडी, सीबीआय यांना जसं हातातील शस्त्र म्हणून वापरत आहेत तसं आता न्यायपालिकाही हातात आहे असं सुचवायचं आहे का?,” अशी विचारणा भुजबळांनी केली.
“मला अटक झाली तेव्हा दोन महिने आधी त्यांनी अटक होणार असल्याचं सांगितलं होतं. यानंतर अनिल देशमुखांचं सांगितलं आणि आता अनिल परब यांचं नाव घेत आहेत. म्हणून हे घडवून आणत आहेत अशी शंका आहे. लोकांवर फिर्यादी करणं, केसेस टाकणं आणि त्यासाठी यंत्रणा वापरण संध्या चालू आहे. ही यंत्रणा वापरत असताना न्यायपलिका सुद्ध वापरु लागले का?,” अशी शंका भुजबळांनी उपस्थित केली आहे. हा विषय जास्त वाढवण्यात अर्थ नाही आणि मी जास्त किंमतदेखील देत नाही असं सांगत थोडी सहनशीलता वाढवली पाहिजे असा सल्ला त्यांनी चंद्रकांत पाटलांना दिला.