जळगाव (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा, तसेच आत्मविश्वास वाढावा, यासाठी येथील अ.भा. नाट्य परिषदेची शाखा आणि गंधार कला मंडळातर्फे साहित्य अभिवाचन शिबिर १२ एप्रिलपासून आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर सात दिवस चालेल.
इयत्ता पाचवी ते नववीच्या मुला-मुलींसाठी असणाऱ्या या शिबिरात कथा, कविता, अग्रलेख, नाटिका, ललित निबंध, कादंबरी, नाट्यछटा अशा साहित्य कृतींचे कौशल्यपूर्ण वाचन कसे करावे, पाठांतर कसे करावे, सभाधीटपणा कसा असावा, यासंबंधी तज्ज्ञ व्यक्ति त्यात मार्गदर्शन करतील. शिबिरात दाखल होतांना कोणत्याही पुस्तकातील उतारा किंवा कविता पाठ करुन येणे अपेक्षित आहे. सहभाग घेणाऱ्या सर्वांना रोज अल्पोपहार व शिबिर संपल्यावर प्रमाणपत्र देण्यात येईल. शिबिर झाल्यानंतर गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांनी केलेल्या अभिवाचनाचे सादरीकरण करण्यात येईल. या शिबिरासाठी १० एप्रिलपर्यंत नोंदणीची मुदत आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी रमेश भोळे आणि विशाखा देशमुख यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.