चाळीसगाव, प्रतिनिधी । उन्हाचे झळा जाणवू लागल्याने तालुक्यातील चैतन्य तांडा येथे पिण्याचे पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. या समस्येमुळे ग्रामस्थ त्रस्त असून तात्काळ ही गैरसोय दूर करण्यासाठी गिरणा नदीपात्राच्या आवर्तनातून चैतन्य तांड्याला पाणीपुरवठा करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन तहसीलदार यांना आज देण्यात आले.
तालुक्यातील चैतन्य तांडा ग्रामपंचायतीला वडगावच्या नदीपात्रातून पाणीपुरवठा होत होता. मात्र वडगावच्या नदीपात्रात मुबलक पाणी नसल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून गावाला पाणीपुरवठा ठप्प आहे. या समस्येमुळे ग्रामस्थ त्रस्त आहे. त्यामुळे गिरणा नदीपात्रात आवर्तन असून त्यातून पाणीपुरवठा केला जावा या आशयाचे निवेदन तहसीलदार अमोल मोरे यांना देण्यात आले. एप्रिल महिना सुरू झाला असल्याने उन्हाचे चटके तीव्र स्वरूपात जाणवू लागले आहेत. त्यात गावात पिण्याचे पाणीच नसल्याने अनेकांना तारेवरची कसरत करावी लागत आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून गावाला पाणीपुरवठा करण्यात आलेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन माजी चेअरमन दिनकर राठोड यांनी तहसीलदार अमोल मोरे यांना निवेदन दिले. तात्काळ हि समस्या मार्गी लावावी अशी मागणी दिनकर राठोड यांनी यावेळी केला. याप्रसंगी माजी सरपंच विकास चौधरी (वाघळी), माजी सरपंच महादू राठोड (करगाव) व पोलिस पाटील अशोक चव्हाण आदी उपस्थित होते.