उद्धव ठाकरे, अजित पवार, बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत बाळासाहेब ठाकरे स्मारक भूमिपूजन सोहळा

 

 

 

 

मुंबई : वृत्तसंस्था ।  स्व बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि  महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे महाविकास आघाडीतले तीन प्रमुख नेते उपस्थित होते. त्यामुळे  या सोहळ्याला महाविकासआघाडीचा सोहळा असंच स्वरूप पाहायला मिळालं.

 

देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांना निमंत्रण  नसल्याने  आरोप-प्रत्यारोप केले जात होते.  सरकारकडून मात्र मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा आयोजित केल्याचं सांगितलं होतं. या पार्श्वभूमीवर संध्याकाळी हा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.

 

 

 

या सोहळ्यामध्ये सुरुवातीला बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र आणि  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजनाचा विधी पार पडला. त्यानंतर त्यांच्या हस्ते स्मारकाच्या आवारातच वृक्षारोपण केलं गेलं. त्यानंतर महाविकास आघाडीतील दुसरा प्रमुख पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते  अजित पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. आणि शेवटी  महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते देखील वृक्षारोपण करण्यात आलं.

 

 

 

बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक हा सरकारी कार्यक्रम असल्यामुळे या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना देखील निमंत्रित केलं जाईल अशी अपेक्षा होती. मात्र, तसं झालं नाही. त्यामुळे भाजपाच्या नेतेमंडळींकडून त्यावर तीव्र  टीका केली गेली. नितेश राणे यांनी देखील “आज बाळासाहेब असते तर पहिलं निमंत्रण देवेंद्र फडणवीसांना दिलं असतं”, असं म्हणत निशाणा साधला होता.

 

मनसे अध्यक्ष आणि बाळासाहेब ठाकरेंचे पुतणे राज ठाकरे यांना देखील कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलेलं नव्हतं. त्यावरून देखील मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी निशाणा साधत “सरकार पडण्याची भिती होती म्हणून इतक्या घाईत भूमिपूजन सोहळा करून घेतला”, अशी खोचक टीका केली आहे. कुलाबा येथे काही महिन्यांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिकृतीचं अनावरण करण्यात आलं होतं. त्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, मनसे, रिपाइं असे सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. मात्र, यावेळी फक्त महाविकासआघाडी सरकारमधल्याच पक्षातील नेत्यांना आमंत्रण दिल्यावरून टीका केली जात होती.

 

मुंबईतील जुन्या महापौर निवासस्थानाची वास्तू बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी अंतिम करण्यात आली असून तिथे बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक उभारलं जाणार आहे.

 

Protected Content