मुंबई वृत्तसंस्था । महाराष्ट्र राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याऐवजी केंद्र सरकारच बरखास्त केलं पाहिजे. केंद्राकडून राज्याच्या स्वायत्ततेवर घाला घातला जातोय, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, गृहमंत्री अनिल देशमुखांचे काय होणार, हा महाराष्ट्रापुढील किंवा देशासमोरील महत्वाचा प्रश्न नाही. मुंबईच्या माजी पोलिस आयुक्तांच्या खांद्यावर बंदुक ठेवून सरकारवर निशाणा साधला जातोय, असं ते म्हणाले. ते म्हणाले की, एकेकाळी परमबीर सिंह यांच्यावर शंका उपस्थित करणारे आज त्यांचा वापर करुन तोफा उडवत आहेत. परमबीर सिंह हे विरोधकांचं महत्वाचं शस्त्र आहे. केंद्रीय तपास यंत्रणांविषयी आमच्यात दुमत नाही. केंद्रीय तपास यंत्रणा महाराष्ट्रात घुसत आहेत हा महाराष्ट्रावर घाला आहे. याबाबत शरद पवार यांचंही तेच मत आहे. मात्र एकदा तपास सुरु केल्यावर त्यांना सहकार्य करायला पाहिजे जे आम्ही करत आहोत, असेही संजय राऊत म्हणाले.