भोपाळ : वृत्तसंस्था । मध्य प्रदेशात महिलेने बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचं गुप्तांग कापल्याची घटना समोर आली आहे.
पोलिसांनी आरोपी आणि पीडित दोघांवरही गुन्हा दाखल केला आहे. मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. आरोपी घरात घुसून बलात्कार करण्याचा प्रयत्न करत असताना ४५ वर्षीय महिलेने त्याचं गुप्तांग कापलं. गुरुवारी रात्री ही घटना घडली.
महिलेने पोलीस तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, घटना घडली तेव्हा पती घराबाहेर होता. “आरोपी घरात घुसला तेव्हा महिला आणि तिचा १३ वर्षांचा मुलगा घऱात होते. चोर समजून मुलगा भीतीने घरातून बाहेर पळून गेला,” अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. यावेळी आरोपीने महिलेला मारहाण करत लैंगिक शोषणाचा प्रयत्न केला. जवळपास २० मिनिटं महिला विरोध करत होती असं अधिकाऱ्याने सांगितलं आहे.
“आत्मसंरक्षण करताना महिलेने तिथे खाटेखाली पडलेला कोयता उचलला आणि आरोपीचं गुप्तांग कापलं. यानंतर तिने पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार दाखल केली,” असं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांनी आरोपीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान आरोपीनेदेखील तक्रार केली असल्याने महिलेवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.