चोपडा महाविद्यालयास उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार जाहीर

 

चोपडा, प्रतिनिधी । येथील कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयास कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठतर्फे सन २०१८-१९ चा उत्कृष्ट महाविद्यालयाचा पुरस्कार  जाहीर करण्यात आला आहे. 

 

दि.१७ मार्च रोजी विद्यापीठाने अधिसूचनेद्वारा उत्कृष्ट महाविद्यालयाचा पुरस्कार जाहीर केला आहे. महाविद्यालयात नव्याने वनस्पती शास्र, हिंदी व गणित विषयात पदवी तसेच गणित, भौतिक शास्त्र व इलेक्ट्रॉनिक्स या विषयात पदव्युत्तर कोर्सेस बरोबर १७ मूल्यवर्धित कोर्सेससह बिव्होक कोर्स सुरू आहेत.  आज रोजी १७ पदवी, १३ पदव्युत्तर,११ संशोधन विभाग अंतर्गत ज्ञानदानाचे कार्य सुरू आहे. महाविद्यालयात १० आय. सी. टी. क्लास रूमसह स्मार्ट हॉल व भव्य ऑडीटोरियम  हॉल तयार करण्यात आले आहेत. ग्रंथालयात भौतिक सुविधांसह मुलं व मुलींसाठी स्वतंत्र वाचन कक्ष तसेच ओपॅक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. संशोधन क्षेत्रात महाविद्यालयात कार्यरत प्राध्यापक व विद्यार्थी यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील जर्नल,परिषदांमध्ये ३०० शोध निबंध व ५० पुस्तके प्रकाशित झाले आहेत. महाविद्यालयात ७ संशोधन प्रयोग शाळा असून १६ प्राध्यापक पीएच.डी मार्गदर्शक असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज अखेर २० विदयार्थ्यांना पीएच.डी.अवार्ड झाली आहे तर ४२ विद्यार्थ्यांचे कार्य प्रगतीपथावर आहे. महाविद्यालयात प्रती १३  विद्यार्थी १ संगणक उपलब्ध आहे.  एन.एस.एस व एन.सी.सी. मधील विद्यार्थ्यांची सतत दिल्ली येथे होणाऱ्या परेडसाठी निवड झाली असून महाविद्यालयातील स्नेहल शिंदे हिने एन.सी.सी.मुलींच्या तुकडीचे नेतृत्व केले आहे. यासह विविध सामाजिक उपक्रम   यशस्वीपणे राबवले आहेत.  महाविद्यालयाला उत्कृष्ट  महाविद्यालय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष अॅड. संदीप सुरेश पाटील, उपाध्यक्ष आशा विजय पाटील, सचिव डॉ.स्मिता संदीप पाटील यांनी प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी, उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. एल. चौधरी,प्रा. डॉ. व्ही. टी. पाटील, प्रा. एन. एस. कोल्हे, प्रा. डॉ. के. एन.सोनवणे,रजिस्ट्रार डी. एम. पाटील यांच्या सह वर्किंग कमिटी सदस्य, सर्व प्राध्यापक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांचे अभिनंदन केले आहे.

Protected Content