जळगाव प्रतिनिधी । शहरातील मुळजी जेठा महाविद्यालयाच्या सोहम डिपार्टमेंट ऑफ योग ॲण्ड नॅचरोपॅथी विभागाच्या वतीने आज ‘योग आणि निसर्गोपचार’ विषयावर एक दिवसीय ऑनलाईन बेबिनार घेण्यात आले. योग आणि निसर्गोपचाराने या समस्यांवर कशा पद्धतीने उपाययोजना करता येईल याविषयी व्याख्याता डॉ. अर्पिता नेगी यांनी मार्गदर्शन केले.
२७१ महिलांनी नाव नोंदणी करून गुगल मिट आणि यू ट्यूबच्या माध्यमातून ऑनलाईन उपस्थिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. सं. ना. भारंबे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून जी.एच.रायसोनी मॅनेजमेंटच्या संचालिका डॉ. प्रीति अग्रवाल, विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या संचालिका प्रा. मनीष जोशी यांची ऑनलाईन उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात ओंकार प्रार्थनेने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक योग विभागाचे प्राचार्य डॉ. देवानंद सोनार यांनी केले. बीज भाषणामध्ये प्रा. सोनल महाजन यांनी महिलांच्या विविध समस्यांवर प्रकाश टाकून त्याची कारणमीमांसा सांगितली. योग आणि निसर्गोपचाराने या समस्यांवर कशा पद्धतीने उपाययोजना करता येईल याविषयी मार्गदर्शन केले.
व्याख्याता डॉ. अर्पिता नेगी यांनी रजो दर्शनापासून रजोनिवृत्ती पर्यंतचा काळ सुखकर घालविण्यासाठी योगिक चिकीत्स्येचे महत्व विशद करून हार्मोन्स संतुलित करण्यासाठी लाभदायक योगिक प्रक्रियाविषयी माहिती दिली. संपदा पाटील यांनी महिलांच्या मासिक धर्माविषयीच्या विविध समस्या सोडविण्यासाठी निसर्गोपचारातील पंचभौतिक चिकित्सांचा उपयोग प्रात्यक्षिकासह पटवून दिला. व्याख्यानानंतर महिलांच्या शंकाचे समाधानही करण्यात आले. वेबिनारचे सूत्रसंचालन डॉ. प्रीति पाटील यांनी तर आभार प्रा. गीतांजली भंगाळे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. ज्योती वाघ, प्रा. पंकज खाजबागे, प्रा. अनंत महाजन, विकास खैरनार, वासुदेव पाटील यांचे विशेष सहकार्य प्राप्त झाले.