सचिन वाझे यांच्या धक्कादायक स्टेटसमुळे खळबळ !

 

मुंबई : वृत्तसंस्था । मनसुख हिरेन मृत्यू बद्दल आरोप झाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे बदलीनंतर चर्चेत आले आहेत. त्यांनी जे  स्टेटस ठेवलं  त्यावरून वाझे यांच्या मनात चाललंय काय? वाझे यांना काय म्हणायचं?  अशी  चर्चा रंगली आहे. वाझे यांनी स्टेटसमध्ये जगाचा निरोप घेण्यासंदर्भात उल्लेख केलेला आहे.

 

मनसुख हिरेन बद्दल  भाजपाने विधिमंडळ अधिवेशनात सरकारला धारेवर धरलं होतं. हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूबद्दल सवाल करतानाच सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते.  गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाझे यांच्या बदलीची घोषणा केली होती. अखेर वाझे यांची  बदली करण्यात आली आहे.

 

बदली करण्यात आल्यानंतर वाझे यांनी ठेवलेल्या व्हॉट्सअप स्टेटसमध्ये जगाचा निरोप घेण्याची वेळ जवळ आलीय असा उल्लेख केल्याने खळबळ उडाली आहे. “तीन मार्च २००४. सीआयडीमधील काही जणांनी मला खोट्या आरोपांखाली अटक केली. या अटकेसंदर्भात अजूनही वाद आहे. इतिहासाची पुनरावृत्ती होणार अशी शक्यता आहे. मला पुन्हा एकदा खोट्या आरोपांखाली अडकवण्याची शक्यता आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये थोडा बदल आहे. आधी हे घडलं तेव्हा माझ्याकडे १७ वर्षांचा कालावधी होता. आशा होती, धैर्य होतं, आयुष्य आणि नोकरीमधील अनेक वर्ष शिल्लक होती. मात्र आता माझ्याकडे आयुष्याची पुढील १७ वर्षे शिल्लक नाहीयत तसेच नोकरीची एवढी वर्षे आणि अशा पद्धतीने जगण्याचं धैर्यही नाहीय. मला वाटतं जगाचा निरोप घेण्याची वेळ जवळ आलीय,” असं या स्टेटसमध्ये म्हटलं आहे.

 

 

मुंबई पोलीस दलातील सर्वच महत्त्वाच्या प्रकरणांचे तपास अधिकारी असलेल्या सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांची आतापर्यंतची कारकीर्द वादग्रस्तच ठरली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली मोटार सापडल्यावर तपास अधिकारी असलेल्या वाझे यांच्या कथित संबंधांमुळे ते पुन्हा वादात सापडले आहेत.

 

१९९०च्या तुकडीतील वाझे यांनी आपली कारकिर्द गडचिरोलीतून सुरू केली. अल्पावधीतच ते ठाण्यातील चकमकफेम अधिकारी ठरले. त्यामुळेच मुंबई गुन्हे अन्वेषण विभागात त्यांचा मार्ग सुकर झाला. परंतु घाटकोपर बॉम्बस्फोटातील संशयित ख्वाजा युनुस याच्या हत्येप्रकरणी त्यांना निलंबित करण्यात आले. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे ते पुन्हा पोलीस दलात येण्याची शक्यता मावळली. मात्र जून २०२० मध्ये त्यांना पुन्हा सेवेत घेतले गेले. त्यांची थेट नियुक्ती विशेष गुन्हे अन्वेषण अधिकारी म्हणून केली गेली. टीआरपी घोटाळा असो वा अमली पदार्थ तस्करी आदी महत्त्वाच्या प्रकरणांचे तेच तपास अधिकारी म्हणून नियुक्त झाले. रिपब्लिकन टीव्हीचे अर्णब गोस्वामी यांच्या अटकेसाठी आलेल्या रायगड पोलिसांच्या मदतीसाठीही वाझे यांनाच पाठविण्यात आले होते.

Protected Content