मुंबई : वृत्तसंस्था । राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा मंजूर केला असून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या विनंतीनुसार राठोड यांच्या खात्याचा कार्यभार मुख्यमंत्र्यांकडे देण्यास मंजूरी दिली आहे.
मुख्यमंत्र्यांकडून आजच दूपारी संजय राठोड यांच्या राजीनाम्याचे पत्र राज्यपालांना प्राप्त झाले होते.
”संजय राठोड यांचा राजीनामा मंजूर झाला असल्याची माहिती राजभवनातून देण्यात आली. महाराष्ट्रातील जनतेचा संताप पाहता, मुख्यमंत्री कार्यालयाने राज्यपालांकडे राजीनामा पाठवून दिला आहे. आता पुढील कार्यवाही सुरू ठेवावी.” असं विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.
पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी राजीनामा दिल्याचे संजय राठोड यांनी रविवारी जाहीर केले. हा राजीनामा मुख्यमंत्री कार्यालयाने अद्यापही राज्यपालांकडे पाठविलेला नाही. त्यामुळे हा राजीनामा कुठे आहे, तो तसबीर करण्यासाठी ठेवला आहे का? असा सवाल करीत भाजपाने विधानसभेत आक्रमक भूमिका घेतली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत या मुद्दय़ावर मौन बाळगले होते.
विदर्भातील शिवसेना नेते संजय राठोड यांना पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मंत्रिपद गमवावे लागल्यावर त्यांच्या जागी या भागातून कोणाला संधी मिळणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे.