संगमनेर वृत्तसंस्था । . । महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कन्या डॉ. जयश्री थोरात यांच्या नावाने पैसे मागितल्याचा प्रकार समोर आला असून त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
अज्ञात व्यक्तीने डॉ. जयश्री थोरात यांच्या नावाने फेसबुकवर बनावट खाते उघडले होते. याच्या माध्यमातून गेल्या दोन दिवसांपासून काहींना संदेश पाठवून गुगल पे व फोन पे याद्वारे पैशाची मागणी केली. फेसबुक पेजवर मंत्री बाळासाहेब थोरात व त्यांची कन्या डॉ. जयश्री यांचा फोटो वापरण्यात आला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर सिद्धार्थ थोरात यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. कोणीतरी खोडसाळपणा करुन बनावट खाते उघडून पैसे उकळण्याचे काम करत आहेत. हे खाते त्वरित बंद करुन तपास करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान पोलिसांनी अर्जाची तात्काळ दखल घेत बनावट फेसबुक अकाउंट बंद केले असून चौकशी करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.