चाळीसगाव प्रतिनिधी । कर्जबाजारीला कंटाळून आत्महत्या केलेल्या तालुक्यातील दोन शेतकर्यांच्या कुटुंबियांना शासनाने प्रत्येकी एक लाख रुपयांचे वाटप केले असून या धनादेशाचे वाटप आ. मंगेश चव्हाण यांच्या हस्ते तहसील कार्यालयात करण्यात आले.
तथापि, तालुक्यातील कै.अशोक नामदेव गुंजाळ(रा. भऊर) व कै.सुनील भिका पाटील (रा. गणेशपूर) यांनी कर्जबाजारीला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यांच्या कुटुंबीयांना शासनातर्फे प्रत्येकी १ लाख रुपये व दारिद्य रेषेखालील कमावत्या व्यक्तीचे मृत्युनंतर त्यांच्या वारसांना राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्यता योजनेंतर्गत चाळीसगाव तालुक्यातील १९ कुटुंबाना प्रत्येकी २० हजार प्रमाणे ३ लाख ८० हजार रुपये मदतीचे धनादेश आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. तहसील कार्यालयात आयोजित या धनादेश वाटपाप्रसंगी आमदारांनी वितरीत केले.
कार्यक्रमाप्रसंगी प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार अमोल मोरे, पंचायत समितीचे गटनेते संजय भास्करराव पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम आदी उपस्थित होते. यावेळी सदर कुटुंबाना कायमस्वरूपी आधार देण्यासाठी त्यांना विधवा निवृत्तीवेतन व शासनाच्या इतर योजनांच्या माध्यमातून मदत मिळवून देण्याच्या सूचना प्रशासनाला आमदार मंगेश चव्हाण यांनी आवाहन केले आहे.