जळगाव, प्रतिनिधी । भडगाव येथील कलाशिक्षक वाय.आर.पाटील यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित ” अविश्वसनीय सावरकर माझी दृष्टी भगूर ते अंदमान अप्रतिम सृजन ” हे चित्रप्रदर्शन भगूर जिल्हा नाशिक येथे २६ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथी निमित्ताने दि .२६ फेब्रुवारी २०२१ शुक्रवार रोजी त्यांच्या जन्मगावी या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन सावरकर व्याख्याते तथा शब्दमल्हार प्रकाशनाचे संपादक स्वानंदजी बेदरकर नाशिक यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून श्रेयस मेडिकल फाउंडेशन पाचोरा अध्यक्ष डॉ. जयवंतराव पाटील तर सुमित्रा पाटील, मनोज कुवर, राजू पाटील, सुनील पाटील, प्राचार्य राजेंद्र महाजन, ललित कला केंद्र चोपडा, प्राध्यापक संजय नेवे या मान्यवर उपस्थिती राहतील. याचित्र प्रदर्शनात जलरंग व मिश्र माध्यमातील चित्रे प्रदर्शित केली जाणार आहेत. चित्रकार वाय. आर. पाटील हे एस .जी. पाटील माध्यमिक विद्यालय भडगाव येथे २८ वर्षांपासून कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी सावरकर लिखित आणि सावरकरांवरील साहित्याचा सखोल अभ्यास केलेला असून त्यांच्या जीवनचरित्रामुळे ते पराकोटीचे प्रभावित झाले. त्यांनी सेल्युलर जेल अंदमान येथे सुद्धा अभ्यासासाठी भेट दिली आहे. सावरकरांच्या जीवन चरित्रावर चित्र काढत राहणे व ते वेगवेगळ्या ठिकाणी विशेषत: शैक्षणिक संस्था तसेच सेल्युलर जेल अंदमान व लंडन येथे प्रदर्शन भरविणे व या चित्रांद्वारे सावरकरांचा जीवनपट समाजापर्यंत पोहचविण्यासाठीच उर्वरित आयुष्य समर्पित करणे असा कलाशिक्षक पाटील यांचा दृढ मानस आहे. या चित्र प्रदर्शनाच्या आयोजनासाठी भगूर येथील भगूर पुत्रवीर स्वातंत्र्यवीर सावरकर समूहाचे प्रमुख कुंवर व त्यांचे सहकार्य लाभत आहे.