बुलडाणा, प्रतिनिधी । प्रत्येकाने आपली व आपल्या कुटूंबीयांची काळजी घ्यावी. त्यासाठी शासनाने घालून दिलेले नियमांचे काटेकोर पालन करावे. प्रत्येकाने घराबाहेर पडल्यानंतर मास्क किंवा स्वच्छ रूमाल तोंडावर वापरावा, वारंवार हात स्वच्छ धुवावे किंवा सॅनीटाईज करावे, सोशल डिस्टसिंगचे पालन करावे तथा गर्दीमध्ये जाणे टाळावे या त्री सुत्रींचा प्रत्येकाने अवलंब करावा असे आवाहन पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे.
पालकमंत्री ना. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी पुढे सांगितले की, मला १६ फेब्रुवारी रोजी कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर मुंबई येथील ब्रीच कँडी रूग्णालयात उपचार घेण्यात आले. उपचाराअंती आज २२ फेब्रुवारी रोजी मी आपल्या सर्वांच्या कृपाशीर्वादाने कोरोनामुक्त झालो असून मला रूग्णालयातून डिस्जार्ज मिळाला आहे. ही आनंदाची बाब असली तरी जिल्ह्यात वाढत असलेला कोरोनाचा संसर्ग चिंता वाढविणारा आहे. जिल्ह्यात मागील तीन ते चार दिवसांपासून २००, ३०० पेक्षा जास्त रूग्ण आढळून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी कुठेही बेफीक्री दाखवू नये. तसेच आपण डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार १२ दिवस विलगिकरण मध्ये राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
रुग्णालयातून घेत होते जिल्ह्याचा आढावा
१६ फेब्रुवारी रोजी पालकमंत्री कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने मुंबई येथील ब्रिजकँडी या रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. तेथे उपचार सुरू असतांना ते दररोज जिल्ह्यातील अधिकारी यांच्याशी सातत्याने संपर्कात राहून जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा घेत होते.