भुसावळ प्रतिनिधी । शहरातील व्हिआयपी कॉलनीत राहणाऱ्या व्यक्तीची अज्ञात चोरट्याने २५ हजार रूपये किंमतीचा दुचाकी अशोक वाईन समोरून चोरून नेल्याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोहन रामदास हिरे (वय-४३) रा. व्हिआयपी कॉलनी भुसावळ हे हातमजूरीचे काम करतात. त्यांच्याकडे (एमएच ०५ ईबी ३६७८) क्रमांकाची दुचाकी आहे. १६ फेब्रुवारी रोजी रात्री ८ ते ८.३० वाजेच्या सुमारास शहरातील अशोक वाईन्स दुकानासमोरील सार्वजनिक जागेवर दुचाकी पार्किंगला लावली. अज्ञात चोरट्यांनी दुचाकी लांबविल्याचे रात्री ८.३० वाजता उघडकीला आले. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीसात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनिल जोशी करीत आहे.