नागपूरमध्ये ‘डीएमके’ फॉर्म्युला गडकरींविरुद्ध यशस्वी ठरणार ?

 

nitin gadkari

 

नागपूर (वृत्तसंस्था) भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नागपूर मतदार संघामध्ये केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना पराभूत करण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. गडकरींना पराभूत करण्यासाठी काँग्रेस ‘डीएमके’ फॉर्म्युला वापरणार आहे. मात्र या ‘डीएमके’चा तामिळनाडूतील ‘डीएमके’ पक्षाशी काहीही संबंध नसून दलित-मुस्लिम-कुणबी असा हा फॉर्म्युला आहे. त्यामुळे या फॉर्म्युल्याकडे राजकीय निरीक्षकांचं लक्ष लागलं आहे.

नागपूरमध्ये एकून २१ लाख मतदार आहेत. त्यापैकी दलित-मुस्लिम आणि कुणबी (डीएमके) मतदारांची संख्या १२ लाख असून ही मतं निर्णायक समजली जातात. काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले हे स्वत: कुणबी असल्याने ही मतं त्यांची हक्काची असल्याचं मानलं जातं. कुणबी मतांबरोबरच दलित आणि मुस्लिमांची मतं मिळविण्यासाठी पटोले यांनी कंबर कसली आहे. मात्र खैरलांजी प्रकरणामुळे पटोले यांच्याविरोधात दलित समाजात रोष असल्याने दलितांची मतं मिळण्यात पटोले यशस्वी ठरतात का ? याकडे राजकीय निरीक्षकांचं लक्ष आहे.

२०१४ मध्ये गडकरी यांनी नागपूर लोकसभा मतदारसंघातून २.८४ लाख मतांनी विजय मिळविला होता. तर गोंदीया-भंडारा लोकसभा मतदारसंघात पटोले यांनी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना पराभूत केलं होतं. मात्र पटोले यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने त्यांना नागपूरमधून काँग्रेसने तिकीट दिलं आहे. त्यामुळे पटोले हे गडकरींनाही मात देणार का? याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय नागपूरमध्ये असलं तरी २०१४च्या आधीपर्यंत नागपूर काँग्रेसचाच गड राहिलेला होता. या जागेवर केवळ दोन वेळाच भाजप उमेदवाराला विजयी होता आलं होतं. त्यामुळे मतदार यावेळी नागपूरची कमान कुणाच्या हातात देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

Add Comment

Protected Content