भुसावळ प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मराठा समाज मंडळ भुसावळ शहर व तालुका यांच्यातर्फे मंगळवार 16 फेब्रुवारी 2021 रोजी विद्यार्थ्यांसाठी शिवछत्रपती अभिवाचन स्पर्धा 2021 आयोजित करण्यात आली आहे.
भुसावळ शहरातील म्युनिसिपल हायस्कूल येथे ही स्पर्धा सकाळी 8 वाजेपासून सुरू होणार आहे. इयत्ता चौथीच्या शिवछत्रपती पाठ्यपुस्तकावर आधारित ही स्पर्धा होणार असून त्यात भुसावळ शहर व तालुक्यातील सर्व व्यवस्थापन व सर्व माध्यमांच्या शाळेतील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. प्रथम गट पाचवी ते आठवी असून द्वितीय गट (९ वी ते १२ वी) आहे. प्रत्येक गटातील तीन विजेत्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येईल. स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. स्पर्धा शुभारंभ प्रसंगी भुसावळ नगरपरिषद माध्यमिक शिक्षण समिती सभापती मुकेश गुंजाळ, प्राथमिक शिक्षण समिती सभापती अॅड. तुषार पाटील, माजी सभापती राजेंद्र आवटे, गटशिक्षणाधिकारी तुषार प्रधान, मराठा समाज मंडळ अध्यक्ष किरण पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार असून सहभागी स्पर्धकांनी वेळेवर उपस्थित राहून स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन स्पर्धा समन्वयक डी.के. पाटील व डॉ. जगदीश पाटील यांनी केले आहे.