नवी दिल्ली : वृत्तसंस्था । भारताने आतापर्यंत १५ देशांना कोविड १९ प्रतिबंधक लशीचा पुरवठा केला असून आणखी २५ देशांकडून भारतात तयार करण्यात आलेल्या लशीला मागणी आहे,असे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी सांगितले.
भारताकडे लशीची मागणी करणाऱ्यात गरीब देश, किमतीचा विचार करणारे देश व औषध कंपन्यांशी थेट करार करणारे देश अशा तीन प्रवर्गातील देशांचा समावेश आहे. सध्यातरी भारताने १५ देशांना लशीचा पुरवठा केला असून आणखी २५ देशांनी लशीची मागणी केली आहे. त्यांच्या लस पुरवठ्याची प्रक्रिया वेगवेगळ्या टप्प्यांत आहे. त्यामुळे आता लस निर्मिती व पुरवठ्यात भारत जागतिक नकाशावर आला आहे असेही ते म्हणाले .
काही गरीब देशांना अनुदानाच्या स्वरूपात लस पुरवण्यात येत असून काही देश भारत सरकारने ज्या किमतीत लस खरेदी केली त्या किमतीत लस घेऊ पाहत आहेत. काही देश थेट औषध कंपन्यांशी करार करू इच्छित आहेत. त्यांनी व्यावसायिक पातळीवर वाटाघाटी केल्या आहेत. केंद्र सरकारने आधीच भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन व ऑक्सफर्डची सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने तयार केलेली कोव्हिशिल्ड या लशींना मान्यता दिली असून १६ जानेवारीपासून भारतात लसीकरण सुरू झाले आहे. रेड्डीज औषध कंपनीने रशियाची ‘स्पुटनिक ५’ लस तयार करून त्यासाठी युरोपात परवाना मागण्याचे ठरवले आहे.
देशात आतापर्यंत ५४ लाख लोकांना कोविड १९ प्रतिबंधक लस देण्यात आली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. एकूण ५४ लाख १६ हजार ८४९ जणांना लस देण्यात आली असून सर्वात जास्त म्हणजे ६ लाख ७३ हजार ५४२ जणांचे लसीकरण उत्तर प्रदेशात झाले आहे.
महाराष्ट्रात ४ लाख ३४ हजार ९४३, राजस्थानात ४ लाख १४ हजार ४२२, तर कर्नाटकात ३ लाख ६० हजार ५९२ जणांना लस देण्यात आली आहे. भारतात किमान २१ दिवसात पन्नास लाखाहून अधिक लोकांना लस देण्यात आली आहे. हे प्रमाण अमेरिका व इतर देशांनी केलेल्या लसीकरणाच्या वेगापेक्षा अधिक आहे. गेल्या २४ तासात ४ लाख ५७ हजार ४०४ जणांना लस देण्यात आली असून त्यासाठी एकूण १० हजार ५०२ लसीकरण सत्रे आयोजित करण्यात आली होती. आतापर्यंत १ लाख ६ हजार ३०३ सत्रे आतापर्यंत झाली असून त्यात ३ लाख १ हजार ५३७ आरोग्य कर्मचारी व १ लाख ५५ हजार ८६७ आघाडीचे कर्मचारी यांचे लसीकरण झाले आहे. एकूण २० कोटी ६ लाख ७२ हजार ५८९ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या असून सहा राज्यात सर्वाधिक म्हणजे ८३.३ टक्के नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यात महाराष्ट्र, केरळ, गुजरात, तमिळनाडू, छत्तीसगड, कर्नाटक यांचा समावेश आहे.
एकूण कोविड रुग्णांची संख्या १,०८, १४,३०४ झाली आहे. मृतांचा आकडा १ लाख ५४ हजार ९१८ असून २४ तासात ९५ मृत्यू झाले आहेत.