जळगाव प्रतिनिधी । जिल्हा परिषदेतील बहुचर्चीत गौण खनिज घोटाळा, राजमुद्रेचा गैरवापर या प्रकरणी जिल्हा परिषद सदस्या सौ. पल्लवी प्रमोद सावकारे यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली आहे.
जिल्हा परिषद सदस्या सौ. पल्लवी प्रमोद सावकारे यांनी गौण खनिज प्रकरण लाऊन धरले असून त्या सातत्याने याचा पाठपुरावा करत आहेत. अधिकारी आणि ठेकेदारांनी एकत्रितपणे गौण खनिज वाहतुकीचे बोगस परवाने, राजमुद्रेचा गैरवापर यातून शासनाची कोट्यवधी रुपयांची आर्थिक लूट केली असल्याचे कागदोपत्री पुरावे त्यांनी जमा केले आहेत.
दरम्यान, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी या प्रकरणात जि.प.सीईओ डॉ. बी.एन. पाटील यांना ठोस कारवाईचे आदेश दिले आहेत. दरम्यान, यासंदर्भात जि.प. सदस्या पल्लवी सावकारे यांनी तब्बल १७ वेळा पत्रे देवूनही सीईओंच्या स्तरावरून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे यांनी पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी पुराव्यासह निवेदन देऊन कारवाईची मागणी केली.