पाचोरा, प्रतिनिधी । इंटरनेटद्वारे चांगल्या गोष्टी शिकुन त्या आत्मसात केल्यातर युवकांकडुन चांगली पिढी येवु शकते. स्वत:चे व देशाचे उज्वल भवितव्य हे युवकांच्या हाती असुन युवकांनी ताकद लावल्या शिवाय प्रगती होणे शक्य नाही. असे उद्गार कर्जत – जामखेडचे आमदार रोहीत पवार यांनी पाचोरा येथे “युवा संवाद कौशल्य विकास” या कार्यक्रमात युवकांशी संवाद साधतांना काढले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अमळनेर येथील आमदार अनिल पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अॅड. रविंद्र भैय्या पाटील, माजी आमदार मनिष जैन, आशिष देशमुख, रोहीत चौधरी, प्रशांत पाटील, उप विभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील, पोलिस उपअधीक्षक ईश्वर कातकडे आयोजक डॉ. भुषण मगर, डॉ. सागर गरुड, बाजार समितीचे व्हाईस चेअरमन अॅड. विश्वासराव भोसले व्यासपिठावर होते.
भडगाव रोडवरील महालपुरे मंगलकार्यालयात झालेल्या कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत युवकांशी सुसंवाद व हितगुज करतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते तथा आमदार रोहीत पवार यांनी सांगितले की, भारत देश हा युवकांचा देश असुन या देशातील ६० टक्के युवक हे ४० वर्ष वयाचे तर ३० ते ३५ टक्के युवक हे २५ वीच्या जवळपास आहेत. आपला देश युवकांनी भरलेला असल्यामुळे खेळ, कला, उद्योग, निवडणूक या सारख्या गोष्टी युवकांवर विसंबुन असतात. युवक हे शिक्षक घेत असतांना त्यांना चांगली दिशा मिळत नाही. योग्य वेळी योग्य दिशा मिळणे ही काळाची गरज आहे. युवकांनी शिक्षण घेत असताना उद्याचे काय याविषयी विचार करुनच अभ्यासक्रम निवडावा. त्यांनी आई वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी चांगले शिक्षण घ्यावे. जगाशी संपर्क ठेवुन प्रगतीचे शिखर गाठावे.
पुढील १० वर्षात ६० टक्केही नौकऱ्या शिल्लक राहणार नसल्याने विविध व्यवसायात प्रगती साधण्यासाठी वेगवेगळे स्कील डेव्हलपमेंट आत्मसात करुन विकासाचा मार्ग काढला पाहिजे. कारण मार्ग काढण्याची ताकद ही केवळ युवकांकडेच आहे. युवकांनी ज्याच्याकडे विकास आणि विचार आहे अशा राजकीय पक्षाकडे वळले पाहिजे. कोणतेही काम करत असताना एकत्रित येऊन ताकदीने केल्यास त्याचा उपयोग निश्चित होतो. आपला कोणी वापर करून घेत नाही ना ? हे ही ओळखण्याची ताकद युवकांमध्ये असायला पाहिजे. कार्यक्रमात विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलचे संचालक डॉ. भुषण मगर व डॉ. सागर गरुड यांनी छोट्याशा गावात सर्व आजारांवर उपचार करणारे भव्य हाॅस्पिटल उभारल्याने त्यांच्या धाडसाचे कौतुक ही आमदार रोहित पवार यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. भुषण मगर तर आभार प्रा. शिवाजी शिंदे यांनी मानले. कार्यक्रमास सुमारे ५०० युवकांनी हजेरी लावली. यावेळी आमदार रोहित पवार यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यापर्ण करुन विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलला सदिच्छा भेट दिली.
कार्यक्रमानंतर आमदार रोहित पवार यांनी युवकांशी संवाद साधुन रामकृष्ण पाटील (वाणेगाव), सचिन कोकाटे, अर्जुन पाटील, डॉ. प्रशांत पाटील, पंकज पाटील, दत्ता कापसे, शुभम खैरणार यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देवुन पोलिस भरती बाबत कोणत्याही प्रकारची वशिलेबाजी अथवा पैशांच्या आमिषाला कोणीही बळी न पडता निःपक्ष पातीपणे भरती प्रक्रिया पार पडणार असल्याचे आश्र्वासन देवुन विना अनुदानित शाळांवर काम करणाऱ्या शिक्षकांच्या २० टक्के पगारा विषयी विधीमंडळात चर्चा झाल्याचे सांगितले. निवडणूकीत उढळला जणारा पैसा व मद्याविषयी प्रश्न विचारला असता युवकांनीच याबाबत पुढे येवुन निस्वार्थीपणे सर्व सामान्यांची कामे केल्यास व आपले स्वत:चे चांगले आचरण ठेवण्यास या गोष्टी आपोआप बंद होतील व त्यावेळी ग्रामपंचायत पातळीपासूनच युवकांच्या हाती सत्ता येण्यास सुरूवात होईल. असेही आमदार रोहित पवार यांनी सांगितले.
पाचोरा येथे पोलिस व सैन्य भरती बाबत आपल्या फाऊंडेशनतर्फे प्रशिक्षण केंद्र व्हावे अशी मागणी केल्यानंतर रोहित पवार यांनी सांगितले की, आपली भावना चांगली असेल तर याबाबतही विचार करु असे सांगुन संवाद कर्त्यांना खुश केले.
https://www.facebook.com/508992935887325/videos/241399170947636