बुलढाणा वृत्तसंस्था । बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा आणि लोणार नगरपालिकेचा निकाल जाहीर झाला आहे. सिंदखेड राजा नगरपालिकेत नगराध्यक्ष म्हणून शिवसेनेचे सतीश तायडे निवडून आले आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देविदास ठाकरे यांचा दीड हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला आहे. शिंदखेड राजा नगरपालिकेवर शिवसेनेचे 7, राष्ट्रवादीचे 8, अपक्ष 1 तर एक ठिकाणी भाजपचा नगरसेवक विजयी झाला आहे. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शिंदखेड राजा नगरपालिकेची निवडणूक महत्त्वाची मानली जात होती. शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक जास्त जागा आली तरी शिवसेनाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार निवडून आला आहे. शिंदखेड राजा विधानसभेचे माजी आमदार आणि माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे आणि सिंदखेड राजा विधानसभेचे विद्यमान आमदार शशिकांत खेडेकर यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र यामध्ये डॉक्टर शशिकांत खेडेकर यांनी बाजी मारत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पराभव केला आहे. त्यामुळे डॉ. राजेंद्र शिंगणे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
लोणार नगरपालिका
लोणार नगरपालिका सत्ता पलटण्याचा पायंडा यावेळेस मतदारांनी मोडीत काढला. लोणार नगरपालिकेच्या स्थापनेपासून लोणार शहरातील जनतेनं कोणत्याच पक्षाला सलग दोनदा सत्ता दिली नव्हती. मात्र यावेळी लोणारवासियांनी काँग्रेस पक्षाला पुन्हा एकहाती सत्ता दिली आहे. लोणार नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचे आज निकाल जाहीर करण्यात आले. यामध्ये काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदासाठीच्या उमेदवार सौ. पुनम मनिष पाटोळे ह्या बहुमतांनी विजयी झाल्या. तसेच 17 जागांपैकी काँग्रेस पक्षाचे 10 आणि शिवसेनेचे सात उमेदवार विजयी झाले.