वर्धा : वृत्तसंस्था । सध्या राजकीय हवा बदलली आहे. भाजपचे अनेक बडे नेते आमच्या संपर्कात असून त्यांना लवकरच पक्षात प्रवेश देण्यात येईल, असा दावा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला
देशमुख यांच्या दाव्यामुळे भाजपचे कोणते बडे नेते राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
अनिल देशमुख आज वर्ध्याला आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हा दावा केला. सध्या राजकीय हवा बदलली आहे. भाजपचे बडे नेते आमच्या संपर्कात आहेत. केवळ राष्ट्रवादीच्याच नव्हे तर काँग्रेस आणि शिवसेनेच्याही संपर्कात आहेत. त्यामुळे पुढील काळात पुण्यात जसा पक्षप्रवेश झाला तसं या नेत्यांना पक्षात प्रवेश दिला जाईल. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पैकी ज्या पक्षात ज्या भाजप नेत्यांना जायचं त्या नेत्यांना प्रवेश दिला जाईल, असं देशमुख म्हणाले.
पत्रकार अर्णव गोस्वामी यांनी राष्ट्रीय सुरक्षा कायद्याचं उल्लंघन केलं आहे. बाहेरच्या व्यक्तिंना अशी माहिती मिळवता येत नाही. भाजप आणि गोस्वामी यांची जवळीक गेल्या वर्षभरापासून पाहत आहोत. केंद्र सरकार आणि राज्यातील तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने गोस्वामी यांची सातत्याने पाठराखण केली आहे, असं सांगतानाच वरिष्ठ नेत्यांपैकी काही नेत्यांनी राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित बाब अर्णवला सांगायला नको होती. ती सांगितली, अशी शंका आहे, असं देशमुख यांनी सांगितलं.
अर्णव चॅट प्रकरणाची केंद्र सरकारने चौकशी करायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान, राज्य सरकारने अर्णव प्रकरणी काय पावलं उचलता येईल? बाबत कायदेशीर सल्ला मागितला आहे. कायदेशीर सल्ला मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.