सावदा, प्रतिनिधी ।येथील नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी यांनी आतापर्यंत कोणती कोणती कामे केली आहेत याची चौकशी करून योग्य तत्काळ कारवाई करावी अन्यथा जळगाव येथे २६ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करू असा इशारा नगरसेविका नंदाबाई लोखंडे यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनाचा आशय असा की, नगरसेविका नंदाबाई लोखंडे यांनी आरोग्य अधिकारी व आरोग्य प्रमुख महेश श्रीकांत चौधरी यांची नियुक्ती व नियुक्तीपासून त्यांनी कोणती कामे केली आहेत याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात अशी मागणी केली आहे. महेश चौधरी हे ६० टक्के पेक्षा जास्त दिव्यांग आहेत. त्यांनी नोकरीला लागल्यापासून आजपर्यंत किती प्रवास भत्ता घेतला असून तो नियमाने आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला आहे. हा भत्ता नियमात नसेल तर ही जादा घेतलेली रक्कम त्याच्याकडून वसूल करण्यात यावी. नगरपरिषदेत चौधरी हे वाचमन पदावर भारती झाले होते. सेवा जेष्ठतेनुसार इतर कर्मचारी पात्र असतांना त्यांना डावलून चौधरी यांना पदोन्नती देण्यात आली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. चौधरी यांनी ज्या मालमत्ताधारकांकडे शौचालय आहे अशांना शौचालय बांधण्यासाठी अनुदान वितरीत केले आहे. २०११-२०१२ पासून शौचालय व्हॅक्यूमची किती पावत्या फाडण्यात आल्या आहेत व या व्हॅक्यूमला डिझेलचा खर्च किती झाला याची माहिती निवेदनात मागण्यात आली आहे. याची चौकशी करून योग्य तत्काळ कारवाई करावी अन्यथा जळगाव येथे २६ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करू असा इशारा नगरसेविका नंदाबाई लोखंडे दिला आहे.