मविप्र संस्थेत राजकीय हस्तक्षेप नाहीच – निलेश भोईटे

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेत कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्याचा हस्तक्षेप नसून संस्थेचा कारभार शासनाच्या नियमानुसार व उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सुरु आहे. संस्थेवर मिळविण्यात आलेला ताबा हा राजकीय दबावातून व माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांच्या दबाव तंत्रातून आहे, असा करण्यात आलेल्या आरोपात अजिबात तथ्य नसल्याचा खुलासा मविप्र संस्थेचे मानद सचिव निलेश भोईटे यांनी माध्यम प्रतिनिधीशी बोलतांना केला आहे.

मविप्र प्रकरणी माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्यासह 29 जणांवर विजय भास्कर पाटील यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर गिरीश महाजन व विजय भास्कर पाटील यांनी एकमेकांवर पत्रकार परिषदेतून आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या दरम्यान आज मविप्र संस्थेचे मानद सचिव यांनी माध्यम प्रतिनिधीशी बोलतांना विजय भास्कर पाटील यांनी केलेल्या आरोपांना उत्तर दिलं आहे.

निलेश भोईटे बोलतांना पुढे म्हणाले की, विजय भास्कर पाटील हे भोईटेंना पारंपरिक विरोधक मानतात असं असतांना कोणी भोईटेंनी त्यांना फोन करावा आणि ते संस्थेचं दप्तर घेण्यासाठी एका फोन वर पुण्याला येणं हे काही पटणारं नाही. एकीकडे तत्व सांगायचं आणि दुसरीकडे तत्व सोडून निलेश भोईटे यांना तीन लाखाची खंडणी दिली असं म्हणायचं, खंडणी घेण्याचं प्रयोजनच नाही उगाचच काहीही आरोप करायचे हे त्यांचे नेहमीचे आहे. याप्रकरणी पोलीस चौकशी सुरु आहे त्यामुळे यावर मी अधिकचं बोलणार नाही असं निलेश भोईटे यावेळी म्हणत होते.

मविप्र संस्थेच्या सहाशे कोटी रुपयाच्या जमिनीवर माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांचा डोळा असल्याचा गंभीर आरोप विजय पाटील यांनी केला असून सदर आरोप हास्यास्पद आहे. संस्थेच्या मालकीच्या असणाऱ्या जमीनी या कधीच खरेदी विक्री होऊ शकत नाहीत… त्या जमिनींचा विनियोग झाला नाही तर फक्त त्या सरकार जमा होऊ शकतात एवढं जरी यांना माहित नसेल तर यांची कीव येते असा टोला लगावत आ. महाजनांचा या जमिनींवर डोळा ठेवण्याचा विषयच येत नाही. तसेच या जमीनी मराठा संस्थेच्या असल्याने आम्ही कधी व्हॅल्युएशन काढल्या नाहीत पण या जमिनींचे व्हॅल्युएशन विजय पाटील यांनी का काढल्या असाव्या याचं उत्तर त्यांनी द्यावं.

लवकरच खुलासे करणार

या सर्व प्रकरणावर लवकरच पत्रकार परिषद घेऊन विस्तृत स्वरूपात खुलासे करणार असल्याचंही निलेश भोईटे यांनी यावेळी सांगितल्याने याप्रकरणी काय गौप्यस्फोट करतील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

 

Protected Content