जळगाव प्रतिनिधी । लग्नात हळदिच्या कार्यक्रमात हातात तलवार घेवून नाचणारा सराईत गुन्हेगार तलवार घेवून दहशत माजविणारर्या तरूणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्याच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रमोद शरद इंगळे (वय २६) रा. हरिविठ्ठल नगर असे अटक केलेल्या तरूणाचे नाव आहे. शहरातील हरिविठ्ठल नगरातील प्रमोद इंगळे हा काही दिवसांपूर्वी लग्नातील हळदीच्या डिजेच्या कार्यक्रमात हातात तलवार घेवून नाचत होता. त्याचा व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. तसेच आज प्रमोद इंगळे हा सकाळच्या सुमारास हातात तलवार घेवून बाजारपट्ट्याजवळ आरडाओरड करुन दहशत माजवित असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी पंकज शिंदे यांना मिळाली. त्यांनी ही माहिती पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना देताच त्यांनी प्रदिप पाटील, गोरखनाथ बागुल, महेश महाजन, विजय पाटील यांचे पथक कारवाईसाठी रवाना केले. या पथकाने प्रमोद इंगळेला अटक करीत त्याच्याकडून २ हजार रुपये किंमतीची धारदार तलवार हस्तगत केली. याप्रकरणी पोलीस कर्मचारी पंकज शिंदे यांच्या फिर्यादीवरुन जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.