मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी रावसाहेब दानवे यांची केंद्रीय मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे.
शेतकऱ्यांच्या आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा दावा केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी बुधवारी केला होता. यावर आता वादंग निर्माण झाला आहे. त्यानंतर विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केली आहे. त्यानंतर आता महेश तपासे म्हणाले की, शेतकऱ्यांचे आंदोलन हे कृषी कायदा रद्द करण्यासाठी सुरु आहे. मोदी सरकारच्या बेजबाबदार धोरणाविरोधात शेतकरी वर्गामध्ये चीड निर्माण झाली आहे. त्यामुळेच देशातील शेतकऱ्यांनी असहकार आंदोलन सुरु केले आहे.
शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना भाजपचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला चीन आणि पाकिस्तानचा पाठिंबा आहे, असे वक्तव्य करुन संबंध देशातील शेतकरी वर्गाचा अपमान केला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रावसाहेब दानवे यांची केंद्रीय मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.