मुंबई : वृत्तसंस्था । राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येबाबत तसेच मृत्यूच्या आकडेवारीवरुन सरकारवर अनेकदा टीका झाली. पण सरकारने कुठलाही लपंडावाचा खेळ केलेला नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिलं आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, “कोरोनाच्या या कठीण प्रसंगातून कोणतंही राज्य, देश सुटलेला नाही. याचा अर्थव्यवस्थांना फटका बसला. पण अशा परिस्थितीतही आपण रुग्णसंख्या किंवा रुग्णांच्या मृत्यूंची संख्या यामध्ये कुठेही लपंडावाचा खेळ केलेला नाही. जे आहे ते स्वच्छ आणि पारदर्शकपणे जनतेच्या समोर ठेवलं. आपल्याला या संकटातून बाहेर पडायचं असल्याने यातून काहीही लपवालपवी केलेली नाही.”
“काहीजण विचारतात की त्यांच्यापेक्षा तुमच्याकडे रुग्णसंख्या जास्त कशी तर यावर उत्तर हेच आहे की जे खरं आहे ते आम्ही दाखवतोय. सुरुवातीचे आकडे जसे खरे होते तसे आजचे आकडेही खरेच आहेत. या सगळ्यांमध्ये जनतेचे आभार मानावेत ते थोडेचं आहेत. कारण सरकार जे जे सांगतं आहे ते जनता ऐकत आहे. म्हणूनच अद्याप आपण या संकटावर मात केलेली नसली तरी लवकरात लवकर मात केल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास आहे,” असं ठाकरे यावेळी म्हणाले.
“माझ्यावरती टीका होते की मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत. पण आमचे सरकारी घरोघरी जात आहेत. त्यामुळे मी निश्चिंत आहे. मला सगळ्यांवर विश्वास आहे, मला कोणाचेही फोन टॅपिंग करण्याची गरज नाही. सहकारी म्हणायचं आणि त्यांचेच फोन टॅपिंग करायचे हे आपले धंदे नाहीत. माझा सर्वांवर विश्वास आहे आणि त्या विश्वासानं आपण काम करतोय,” अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता विरोधकांवर टीका केली.