जळगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फुले मार्केट परिसरात जास्त गर्दी होऊ नये यासाठी अतिक्रमण हॉकर्सधारकांवर आज महापालिका अतिक्रमण विभागाचे उपायुक्त संतोष वाहुळे यांच्यासह पथकाने पोलीस बंदोबस्तात धडक कारवाई करत दुकानदारांकडून दंड वसूल करण्यास सुरूवात केली आहे.
गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. याची खबरदारी म्हणून आजपासून सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी परित केले आहे. त्याचबरोबर बाजारात नागरीकांनी गर्दी होऊ नये यासाठी रस्त्यांवर हॉकर्स धारकांनी लावलेल्या दुकानांमुळे गर्दी अधिक होत असल्याने गेल्या दोन ते तीन दिवसांपासून महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. आज शहरातील फुले मार्केट समोरील पार्कींग झोनच्या बाहेर लावण्यात आलेल्या दुकानांवर महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. प्रत्येकी ५०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. सोबत विनामास्क, गर्दीच्या ठिकाणी देखील नागरीकांना दंड देण्यात आला आहे. बाजारात गर्दी टाळावी, सोशल डिस्टन्सिंग पाळावे, प्रत्येकाने मास्क वापरण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/150772300110081/