नवी दिल्ली : वृत्तसंस्था । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांमुळे भारताची ताकदच कमकुवत झाली. देशात पहिल्यांदाच मंदी आली आहे या आशयाचं ट्विट करत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणामुळेच भारत मंदीच्या फेऱ्यात अडकला आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेकडून प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीचाही दाखला दिला आहे. जुलै ते डिसेंबर या तिमाहीत देशाचे सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपी आहा ८.६ टक्के राहिल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
चालू आर्थिक वर्षात पहिल्या तिमाहीत विकास दर (जीडीपी) उणे २३.९ टक्क्यांनी खाली आला होता. गेल्या वर्षी २०१९-२० मध्ये पहिल्या तिमाहीत विकासदर ५.२ टक्के होता.लॉकडाउन यामुळे उत्पादन, गृहनिर्माण, खाण, सेवा क्षेत्रात मोठी घसरण झाल्यामुळे ही वेळ ओढवली होती.
बिहार निवडणूक जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकास हाच आमच्या यशाचा आधार आहे असं म्हटलं होतं. दरम्यान आज देशाच्या विकासाच्या मुद्द्यावरच शाब्दिक प्रहार करत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.