जळगाव, प्रतिनिधी । के.सी.ई. सोसायटी संचलित ओरियन सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या सुषमा कंची यांची केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड यांच्यावतीने जिल्हा समन्वयक म्हणून निवड करण्यात आलेली आहे.
यावर्षी इयत्ता दहावीच्या मार्केशीटचे वितरण करण्यासाठी नोडल सेंटर म्हणून ओरियन सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलला अति महत्त्वाची जबाबदारी देण्यात आलेली होती. दरवर्षी प्रत्येक शाळेचे इयत्ता दहावीचे मार्कशीट बोर्डाकडून त्यांच्या शाळेच्या कार्यालयात वैयक्तिकरित्या पाठवले जात होते. परंतु ह्या वर्षी कोरोनाच्या परिस्थितीला लक्षात घेता जळगाव जिल्ह्यातील सर्व ३३ सीबीएसई स्कूलच्या इयत्ता दहावीच्या मार्कशीटचे नोडल सेंटर हे ओरियन सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल ठेवण्यात आलेले होते. त्यानुसार ओरियन सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने स्कूलचे जनसंपर्क अधिकारी सुधाकर शुक्ला हे पुणे येथील कार्यालयात स्वतः गेले व तेथून त्यांनी या सर्व ३३ शाळांच्या दहावीचे मार्कशीट ओरियन सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल येथे आणले व तेथून दोनच दिवसात सर्व शाळांना ते नियमानुसार वितरित करण्यात आले. ही अति महत्त्वाची जबाबदारी ओरियन सीबीएसई स्कूल च्या प्राचार्या सुषमा कंची यांनी यशस्वीरित्या पार पाडली. या महत्त्वपूर्ण कामगिरीच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे व इतर सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.