Home Cities जळगाव जळगावात संत बाबा गेलाराम साहिब यांचा ९६ वा जयंती उत्सव; ८७ मुलांचा...

जळगावात संत बाबा गेलाराम साहिब यांचा ९६ वा जयंती उत्सव; ८७ मुलांचा सामूहिक जनेऊ संस्कार


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव साहिब येथील पूज्य सेवा मंडळात संत बाबा गेलाराम साहिब यांचा ९६ वा वाढदिवस गुरुवार, १२ मार्च रोजी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. विविध धार्मिक कार्यक्रम, सामूहिक जनेऊ संस्कार आणि संगीतमय कार्यक्रमांच्या माध्यमातून हा सोहळा भक्तांच्या मोठ्या उपस्थितीत पार पडला. या निमित्ताने जळगावसह देशातील विविध शहरांमधून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

कार्यक्रमाची सुरुवात पहाटे पाच वाजता पंचामृत अभिषेकाने करण्यात आली. भक्तांनी श्रद्धेने संत बाबा गेलाराम साहिब यांच्या प्रतिमेला अभिषेक अर्पण करत प्रार्थना केली. सकाळच्या या धार्मिक विधीनंतर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे देशातील विविध भागांमधून आलेल्या ८७ मुलांचा सामूहिक जनेऊ संस्कार समारंभ. पारंपरिक विधी आणि धार्मिक मंत्रोच्चारांच्या वातावरणात हा समारंभ पार पडला. यानिमित्ताने भव्य मिरवणूकही काढण्यात आली होती. या मिरवणुकीत भाविकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला आणि संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.

अमर शहीद संत कंवरराम ट्रस्टतर्फे या सामूहिक जनेऊ समारंभात सहभागी झालेल्या सर्व मुलांसाठी मोफत कपडे, चप्पल तसेच राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. ट्रस्टच्या या सामाजिक उपक्रमामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळाला असून धार्मिक परंपरा जपण्यासही प्रोत्साहन मिळाले.

संध्याकाळी संत बाबा गेलाराम साहिब यांच्या नावाने संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भजन, कीर्तन आणि भक्तिगीतांच्या सुरेल सादरीकरणाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमांमुळे पूज्य सेवा मंडळ परिसरात आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते.

या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन अमर शहीद संत कंवरराम ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी केले. ट्रस्टचे सचिव रमेश मताणी यांच्यासह सर्व सदस्य, महिला मंडळ आणि स्वयंसेवकांच्या सहकार्याने हा सोहळा यशस्वीपणे पार पडला.


Protected Content

Play sound