चोरट्यांचा नविन फंडा; खिडकीतून स्प्रे मारून मोबाईलची चोरी, तालुका पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । घरात चोरी करण्यापुर्वी खिडकीतून स्प्रे मारून गाढ झोपेत असल्याचा फायदा घेवून घरातून महागडा मोबाईल चोरी केल्याची घटना तालुक्यातील आव्हाने शिवारात घडली आहे. तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

तालुक्यातील आव्हाने शिवारातील सक्षम पार्क येथील रहिवाशी अनिल सखाराम शिंदे (वय-४३) हे जिल्हा सत्र न्यायालयात लिपीक म्हणून नोकरीला आहे. ते आपल्या परिवारासह राहतात. शुक्रवारी १७ रोजी नेहमीप्रमाणे रात्री जेवण करून घरातील सर्व सदस्य झोपले. मध्यरात्री अज्ञात चोरट्याने खिडकीपासून ५ फुट अंतरावर असलेला चार्जिंगला लावलेला मोबाईल लंपास केला. दरम्यान, त्यांच्या घराच्या शेजारी राहणारे मनोज रायसिंग हे मॉर्निंग वाकला जाण्यासाठी उठले असता त्यांच्या घराचा दरवाजा बाहेरून लावला होता. रायसिंग यांनी समोर राहणारे व्यक्तींना आवाज देवून घराचा दरवाजा उघडविण्यास सांगितला. त्यानंतर त्यांनी अनिल शिंदे यांच्या घराची खिडकी उघडी दिसली मात्र घरात सर्वजण झोपले होता. शिंदे यांना आवाज दिल्यानंतर झोपेतून उठले. शिंदे झोपेतून उठल्यानंतर त्यांच्यासह त्यांच्या घरातील इतर सदस्यांचे डोके दुखायला लागले. त्यानंतर त्यांनी चार्जिंगला लावलेला मोबाईल दिसून आला नाही. दरम्यान चोरट्यांनी घरात स्प्रे मारल्याने सर्वजण गाढ झोपेत होते. याचा फायदा घेत चोरट्यांनी घरातून मोबाईल लांबविला.

मोबाईल चोरी आणि घडलेला प्रकार शिंदे यांनी तालुका पोलीसांना सांगितले. अनिल शिंदे यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पो.कॉ. विश्वनाथ गायकवाड करीत आहे.

Protected Content