मुंबई-वृत्तसेवा : राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली असून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. यासंदर्भातील शासन निर्णय जाहीर झाला असून सरकारने तब्बल 1,774 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यास मंजुरी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील सुमारे 90 लाख 34 हजार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात हा हप्ता थेट जमा केला जाणार आहे. पीएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेल्या या योजनेतून शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य दिले जाते. या निर्णयामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून दरवर्षी 6,000 रुपये अनुदान दिले जाते. यासोबतच पीएम किसान योजनेतूनही 6,000 रुपये मिळत असल्याने पात्र शेतकऱ्यांना वर्षभरात एकूण 12,000 रुपयांची मदत मिळते. या योजनांमुळे शेतीसाठी आवश्यक खर्च भागविण्यास हातभार लागत असल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे.
या योजनेअंतर्गत आतापर्यंत 7 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. दरम्यान, पीएम किसान योजनेचा 8वा हप्ता 13 मार्च 2026 रोजी जमा झाल्यानंतर राज्य सरकारनेही नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देण्याच्या हालचालींना वेग दिला आहे. या महिन्यातच पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेतून मिळून सुमारे 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याने आर्थिक दिलासा मिळाला आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी ॲग्री स्टॅक (Agri Stack) नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. त्याचबरोबर पीएम किसान योजनेसाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण करणेही आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप नोंदणी किंवा केवायसी पूर्ण केलेले नाही, त्यांना या हप्त्याचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी तातडीने आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
सरकारने निधीची तरतूद पूर्ण केल्याने पुढील आठवड्यात हा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत होणार आहे.



