आदिवासी अकादमी अंतर्गत विकास कामांसाठी विद्यापीठाकडून ८५ लाखांच्या निधीला मंजूरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नंदुरबार जिल्हा नियोजन समितीने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आदिवासी अकादमी अंतर्गत नंदुरबार येथे होणाऱ्‍या व्यवसाय आणि समुदाय विकास केंद्राच्या विद्युतीकरण व तत्सम सुविधांसाठी ८५ लाख रूपये निधी देण्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संचलित आदिवासी अकादमी नंदुरबार येथे उभारण्यात येत असून या अकादमीच्या माध्यमातून विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील आदिवासी व आदिवासी क्षेत्रांच्या विकासाच्या सध्यस्थितीचे निरंतर अध्ययन, संशोधन, प्रकाशन, प्रसारण करणे, आदिवासी क्षेत्रांच्या विकासार्थ मनुष्यबळ निर्मिती करणे, कार्यक्रम व उपक्रम राबविणे आदी काही उदिष्ट्ये निश्चित करण्यात आली आहेत. त्यातीलच एक व्यवसाय आणि समुदाय विकास केंद्र असणार आहे. आदिवासी समाजात शिक्षणातील गळतीचे प्रमाण मोठे आहे. मुलींच्या गळती प्रमाणातील वाढ लक्षात घेता या केंद्रामार्फत मुलींच्या शिक्षणावर विशेष लक्ष दिले जाणार आहे. त्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण देवून कौशल्य विकसनावर भर दिला जाईल.

आदिवासी तरूणांमध्ये सामाजिक संपर्काचे कौशल्य आणि क्षमता विकसित करणे, शासनाच्या विविध योजनाचा अभ्यास करून जनजागृती करणे, आदिवासी मुला-मुलींसाठी व्यवसाय कौशल्य निर्माण करणारे अभ्यासक्रम सुरू करणे अशी काही उदिष्ट्ये निश्चित करण्यात आली आहेत. या व्यवसाय आणि समुदाय विकास केंद्राच्या विद्युतीकरण आणि तत्सम सुविधांसाठी ८५ लाख रूपयांचा निधी देण्यास नंदुरबार जिल्हा नियोजन समितीने प्रशासकीय मान्यता दिली आहे. जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना या लेखाशिर्षांतर्गत हि मान्यता मिळाली आहे.

कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या मार्गदर्शनाखाली नव्या शैक्षणिक वर्षात या अकादमी अंतर्गत काही नव्या अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत. नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल पाटील, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या पुढाकाराने हा निधी प्राप्त झाला आहे. नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मनिषा खत्री, प्रकल्प अधिकारी मंदार पत्की, नंदुरबार जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी, तळोदा नियोजन अधिकारी‍ निर्मलकुमार तोरवणे यांनी विशेष सहकार्य केले. अशी माहिती कुलसचिव डॉ. विनोद पाटील व नंदुरबार आदिवासी अकादमीचे प्रभारी संचालक के. एफ. पवार यांनी दिली.

Protected Content