जामनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी। जामनेर नगरपालिका निवडणूक जवळ येत असून शहरातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापू लागले आहे. १३ प्रभागांमधून २६ नगरसेवक आणि १ नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार असून यासाठी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. सहाव्या दिवशीपर्यंत नगरसेवक पदासाठी तब्बल ८२ अर्ज दाखल झाले असून नगराध्यक्ष पदासाठीही दोन अर्ज दाखल झाल्याने निवडणुकीची रंगत वाढली आहे.
सहाव्या दिवसाच्या अखेरीपर्यंत दाखल झालेल्या अर्जांमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने ज्योत्स्ना विसपुते यांनी दोन अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी एक अर्ज काँग्रेस (आय) तर्फे तर दुसरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) तर्फे दाखल केल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतून नगराध्यक्ष पदासाठी कोणत्या पक्षातून अंतिम उमेदवारी दिली जाणार याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

नगरसेवक पदांसाठी सर्वच प्रभागांमधून विविध पक्ष व अपक्ष इच्छुकांनी अर्ज भरताना मोठी गर्दी पाहायला मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी व प्रांताधिकारी नितीन गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारच्या दिवशी देखील अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू राहणार असून लक्षणीय संख्येने अर्ज येण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
जामनेर नगरपालिकेची निवडणूक स्थानिक राजकारणासाठी महत्त्वाची मानली जाते. शहराच्या विकासकामांसाठी येत्या निवडणुकीत कोणते नेतृत्व पुढे येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वाढत्या अर्जसंख्येमुळे या निवडणुकीत चुरस अधिक तीव्र होणार हे निश्चित झाले आहे.



