कुवेत-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कुवेतमधील एका इमारतीला लागलेल्या भीषण आगीप्रकरणी अधिकाऱ्यांनी 3 भारतीय, 4 इजिप्शियन आणि 1 कुवेती यांना अटक केली आहे. 12 जूनच्या पहाटे 6 मजली इमारतीला लागलेल्या आगीत एकूण 50 लोकांचा मृत्यू झाला, त्यापैकी 45 भारतीय होते. या इमारतीत 196 कामगार राहत होते, त्यापैकी बहुतेक भारतीय होते. अरब टाइम्सच्या वृत्तानुसार, अटक करण्यात आलेल्या 8 जणांना 2 आठवड्यांच्या पोलिस कोठडीत पाठवण्यात आले आहे. त्यांच्यावर निष्काळजीपणा आणि खुनाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुवेतचे अमीर शेख मेशाल अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह यांनी बुधवारी जाहीर केले होते की पीडितांच्या कुटुंबीयांना 1.25 लाख रुपयांची भरपाई दिली जाईल. कुवेत सरकारच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पैसे परदेशी कामगारांच्या दूतावासाला दिले जातील, तेथून ते त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचतील. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये भारताव्यतिरिक्त फिलीपिन्सचे नागरिकही होते.