वरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वरणगाव नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची पहिली सर्वसाधारण सभा शुक्रवारी पार पडली. तब्बल ७९ विषयांच्या अजेंड्यावर चर्चा होत अवघ्या दोन तासांत ७६ विषयांना मंजुरी देण्यात आली. शहराच्या विकासासाठी सर्व सदस्य एकत्रितपणे काम करू, असा संदेश यावेळी सभागृहातून देण्यात आला.
नगरपालिकेत अपक्ष नगराध्यक्षांसह १४ भाजप, ५ शिवसेना आणि २ राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)चे नगरसेवक आहेत. अपक्ष नगराध्यक्ष असल्याने सभा वादळी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. सभेपूर्वी भाजप कार्यकर्त्यांनी भोगावती नदी सुशोभीकरण कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत नगराध्यक्षांवर टीका केली होती. मात्र, सभागृहात या मुद्द्यावर एकाही सदस्याने चर्चा न केल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

अजेंड्यातील ७९ विषयांपैकी ७६ विषयांना मंजुरी देण्यात आली, तर चार ठरावांना नामंजुरी देण्यात आली.
नागेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट येथे प्रस्तावित ‘नमो उद्यान’ इतरत्र हलविण्याचा प्रस्ताव नामंजूर ठरला. तसेच बांधकाम विभागामार्फत होणारी कामे नगरपालिकेमार्फत करण्याचा ठराव, एलईडी दिव्यांच्या दुरुस्ती व देखभालीसाठी ठेकेदार नेमू नये हा प्रस्ताव आणि शहरातील ओपन स्पेस भूखंडांच्या साफसफाईबाबतचा निर्णय — या तीन ठरावांना भाजपच्या १४ नगरसेवकांनी पत्र देत विरोध नोंदवला.
सभागृहात आयत्या वेळच्या विषयाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)चे नाना चौधरी यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. त्यावर सभागृहाने शिक्कामोर्तब केले.
सभेचे अध्यक्षस्थान नगराध्यक्ष सुनील काळे यांनी भूषविले. उपनगराध्यक्ष अरुणा इंगळे, मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे, उपमुख्याधिकारी रशीद नौरंगाबादी, पाणीपुरवठा विभागाचे ज्ञानेश्वर पवार, आरोग्य विभागाचे दिपक काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मनिष चव्हाण, रविंद्र गायकवाड, राजुसिंग चव्हाण, भाजप गटनेता दिपाली माळी, शिवसेना गटनेता तृप्ता महाजन, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट) गटनेता इरफान अली आदी नगरसेवक उपस्थित होते.
सभेचे सूत्रसंचालन संतोष भोई यांनी केले. एकूणच, बाहेर भ्रष्टाचाराचे आरोप आणि राजकीय चर्चा रंगल्या असताना सभागृहात मात्र शांततेत आणि एकमताने बहुतेक विषयांना मंजुरी देत नगरपालिकेच्या नव्या कार्यकाळाची सुरुवात झाली.



