मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नांदेड – बिदर नवीन ब्रॉडगेज प्रकल्पाला वेग देण्यासाठी राज्य शासनाच्या हिश्याच्या ७५० कोटीस मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
या नवीन ब्रॉडगेज मार्गासाठी जमिनीच्या किंमतीसह 15 कोटी 98 लाख इतका खर्च येणार असून त्याच्या 50 टक्के म्हणजे 750 कोटी 49 लाख इतका राज्य शासनाचा आर्थिक सहभाग असणार आहे.
राज्याच्या ग्रामीण आणि अविकसित भागात रेल्वे प्रकल्पांना गती मिळावी यासाठी निवडक प्रकल्पात 40 ते 50 टक्के खर्च उचलण्याचे धोरण राज्य शासनाने स्वीकारले आहे. बिदर-नांदेड हा 157 कि.मी. नवीन रेल्वेमार्ग असून त्यापैकी 100.75 कि.मी. मार्ग महाराष्ट्रातील आहे आणि उर्वरित 56.30 कि.मी. मार्ग कर्नाटकमध्ये आहे. या सरळ रेल्वेमार्गामुळे बिदर ते नांदेड हे अंतर 145 कि.मी. ने कमी होईल. या मार्गावर एकूण 14 रेल्वे स्थानके असतील.